‘कॅरिबियन प्रिन्सेस’ क्रूझवर NORO Virus चा संसर्ग! 115 जणांना बाधा, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
फ्लोरिडातील फोर्ट लॉडरडेल येथून निघालेल्या ‘कॅरिबियन प्रिन्सेस’ या आलिशान क्रूझमध्ये धक्कादायक घटना घडली. 28 एप्रिल रोजी प्रवासाला निघालेल्या या क्रूझमध्ये नोरोव्हायरसचा कहर पाहायला मिळाला. या जहाजात एकूण 3,116 प्रवासी होते. त्यापैकी 102 प्रवासी आणि 13 कर्मचारी अशा एकूण 115 जणांना नोरोव्हायरस या विषाणूची लागण झाली आहे. 28 तारखेला सुरू झालेला हा प्रवास 11 मे रोजीपोर्ट कॅनाव्हेरल येथे संपणार होता. मात्र, त्याआधीच संसर्गाने डोकं वर काढल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने दिलेल्या माहितीनुसार, या संसर्गाची लागण झालेल्या व्यक्तींना प्रामुख्याने उलट्या आणि जुलाब यांसारखी लक्षणे जाणवत आहेत. प्रवाशांना झालेला त्रास हा कोणत्याही संसर्गाने झालेला नसून तो पोटाशी संबंधित आजार असल्याचे प्रिन्सेस क्रूझच्या कंपनीने म्हटले आहे. हा विषाणू अतिशय वेगाने पसरणारा आहे. क्रूझसारख्या बंदिस्त जागी याचा धोका अधिक वाढतो. क्रूझवर प्रवासी एकत्र खातात, पितात आणि सार्वजनिक सुविधांचा वापर करतात. त्यामुळे विषाणू झपाट्याने पसरतात.
हा संसर्ग हळूहळू पसरल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या तीन पटीने वाढत गेली. यानंतर ‘CDC’ ने या आजारासंदर्भात सार्वजनिक नोटीस जारी केली. सध्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून जहाजाची कसून तपासणी केली जात आहे. ‘व्हेसल सॅनिटेशन प्रोग्राम’ अंतर्गत स्वच्छतेचे ऑडिट केले जात आहे. हा संसर्ग नेमका कशामुळे झाला? याचा तपास केला जात आहे. आज तकने हे वृत्त दिले आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून क्रूझ कंपनीने तातडीने जहाजाची साफसफाई करण्यास सुरूवात केली आहे. आजारी पडलेल्या सर्व प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना इतरांपासून वेगळे (आयसोलेशन) ठेवण्यात आले आहे. त्यांच्या रक्ताचे आणि विष्ठेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांना वारंवार हात धुण्याचे आणि सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे.
आजाराचे स्वरूप आणि खबरदारी-
नोरोव्हायरस हा जीवघेणा नसला तरी लहान मुले आणि वृद्धांसाठी तो डिहायड्रेशनचा धोका निर्माण करू शकतो. याचे लक्षण साधारणपणे 1 ते 3 दिवस राहतात. क्रूझसारख्या गर्दीच्या ठिकाणी एखादा बाधित व्यक्ती इंतरांना सहज संक्रमित करू शकतो. सुदैवाने, या जहाजावरील बहुतांश रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना सौम्य लक्षणे असल्याचे सांगण्यात आले आहे.
Comments are closed.