किम जोंग उन यांची हत्या म्हणजे थेट अण्वस्त्र युद्ध, उत्तर कोरियाने अण्वस्त्र हल्ल्याच्या नियमांत केला मोठा बदल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या हत्येनंतर उत्तर कोरिया आपले सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क झाला आहे. ‘टीव्ही९ भारतवर्ष’ने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाने आपल्या संविधानात एक ऐतिहासिक बदल केला आहे. या नवीन नियमानुसार, जर एखाद्या परकीय शत्रूने किम जोंग उन यांची हत्या केली, तर उत्तर कोरियाच्या लष्कराला प्रत्युत्तरात अण्वस्त्र हल्ला करणे बंधनकारक असणार आहे. इराणवर झालेल्या अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर उत्तर कोरियाने हा निर्णय घेतला आहे.

प्योंगयांग येथे २२ मार्च रोजी सुरू झालेल्या १५ व्या सुप्रीम पीपल्स असेंब्लीच्या पहिल्या सत्रात हा घटनादुरुस्तीचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. गुरुवारी दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय गुप्तचर संस्थेने (NIS) सरकारी वरिष्ठ सदस्यांना दिलेल्या ब्रीफिंगमध्ये ही माहिती सार्वजनिक केली आहे.

संविधानात नेमका काय बदल झाला?

एनआयएसच्या ब्रीफिंगनुसार, सद्यस्थितीत उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र दलाची संपूर्ण कमान किम जोंग उन यांच्याकडे आहे. मात्र नवीन बदलांनुसार, जर किम जोंग उन कोणत्या कारणास्तव काम करण्यास असमर्थ ठरले किंवा त्यांची हत्या झाली. तर अण्वस्त्र हल्ल्याची प्रक्रिया कशी असेल हे निश्चित करण्यात आले आहे. सुधारित अण्वस्त्र धोरण कायद्याच्या अनुच्छेद ३ मध्ये नमूद केले आहे की, “जर शत्रू राष्ट्राच्या हल्ल्यामुळे देशाच्या अण्वस्त्र दलाची कमान आणि नियंत्रण प्रणाली धोक्यात आली, तर अण्वस्त्र हल्ला आपोआप आणि तात्काळ सुरू केला जाईल.”

दरम्यान, उत्तर कोरिया सातत्याने आपल्या क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये सुधारणा करत असून, यामुळे शेजारील देशांसह अमेरिकेलाही धोका निर्माण झाला आहे. किम जोंग उन हे कोणत्याही क्षणी अण्वस्त्रांचा वापर करू शकतात, अशी भीती जागतिक स्तरावर व्यक्त केली जात आहे. आता या नवीन कायद्यामुळे जगात अण्वस्त्र युद्धाचा धोका अधिकच वाढला आहे. विशेषतः इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने उचललेले हे पाऊल अत्यंत गंभीर मानले जात आहे.

Comments are closed.