इराण युद्धात उत्तर कोरियाची एन्ट्री, तेहरानसाठी तयार करणार लाँच पॅड
इराणवर अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याचे सावट गडद असतानाच तेहरानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएच्या (CIA) अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, इराणची क्षेपणास्त्रे सुरक्षित ठेवण्याची आणि नवीन लाँच पॅड तयार करण्याची जबाबदारी आता उत्तर कोरियाकडे सोपवण्यात आली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यापासून इराणची शस्त्रे सुरक्षित राहावीत, यासाठी उत्तर कोरियाने आपले तज्ज्ञ तैनात केले असून, तेथील शास्त्रज्ञ तेहरानसाठी नवीन लाँच पॅड विकसित करण्याच्या कामात गुंतले आहेत, असे वृत्त आहे.
अमेरिकी आणि सीआयएच्या अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने ‘अराम न्यूज’ने हे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी इराणने आपली क्षेपणास्त्रे सुरक्षित ठेवण्यासाठी उत्तर कोरियाकडे मदतीची विनंती केली होती, जी उत्तर कोरियाने स्वीकारली आहे. या अहवालानुसार, उत्तर कोरियाचे तज्ज्ञ सध्या प्योंगयांगमधूनच इराणला आवश्यक ती मार्गदर्शक तत्त्वे आणि सल्ले देत असून, येत्या काळात हे शास्त्रज्ञ थेट तेहरानमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
इराणसाठी उत्तर कोरियाची ही मदत अत्यंत निर्णायक मानली जात आहे. नुकत्याच अमेरिकेसोबत झालेल्या संघर्षादरम्यान इराणचे तब्बल ८० टक्के लाँच पॅड उद्ध्वस्त झाले होते. लाँच पॅड नसल्यामुळे इराणला नवीन क्षेपणास्त्रे तयार करता येत नव्हती. आता इराणला आपल्या भूमिगत क्षेपणास्त्र शहरांमध्ये नवीन लाँच पॅड विकसित करायचे आहेत, जेणेकरून अधिक घातक क्षेपणास्त्रे तयार करून भविष्यात अमेरिका आणि इस्रायलचा सामना करता येईल. सध्या इराणकडे लाँच पॅड बनवण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य उपलब्ध नाही आणि युद्धात इराणचे अनेक शास्त्रज्ञही मारले गेले आहेत. दुसरीकडे उत्तर कोरिया सध्या कोणत्याही थेट युद्धात नसल्याने इराणने त्यांच्याकडे मदतीचा हात मागितला आहे.
Comments are closed.