गल्लीत दहशत पसरवणाऱ्यांचे पोलिसांनी वाजवले तीनतेरा, उत्तर मुंबईतील 13 गुंड तडीपार

उत्तर मुंबईतील 13 गुंडांचे पोलिसांनी तीनतेरा वाजविले आहेत. दहिसर समतानगर, दिंडोशी, वनराई, कुरार या पोलीस ठाण्यांत दहशत माजविणाऱया 13 गुंडांना दोन वर्षांसाठी मुंबईतून तडीपार करण्यात आल्याचे उत्तर परिमंडळ-3च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.

घातक शस्त्र्ाांचा वापर करून दहशत निर्माण करणे, नागरिकांना व व्यापाऱ्यांना घाबरवून त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे, न दिल्यास रस्त्यात मारहाण करणे आदी कार्यपद्धती असलेल्या खालील गुंडांना तडीपार करण्यात आल्याचे पोलिसांनी जारी केले आहे.

नईम शहाबुद्दीन धोबी (30, वनराई, गोरेगाव-पूर्व), सुभाष मोतीलाल पटेल (41, कुरार, मालाड-पूर्व), योगेश बाबुराव वाघमारे (30, कांदिवली-पूर्व), सुरेश विजयमाला ऊर्फ नेपल्या (35, दहिसर, केतकीपाडा), अजय दिनेश द्विवेदी (34, वनराई-गोरेगाव-पू.), धीरज विजय गोरेगावकर (34, दिंडोशी-गोरेगाव), जतीन बबन जावळे ऊर्फ जेत्या (25, समतानगर), जयप्रकाश पुदिमा पुरावेल ऊर्फ बाबू (29, समतानगर), दीपांशु जयशंकर सिंग (27, समतानगर, कांदिवली-पूर्व), आशीष विनोद यादव (29, दहिसर, वैशाली नगर), कुशल सुभाष दुबे (40, यशवंत तावडे रोड, दहिसर-पूर्व), आयुष सखर अली अन्सारी (26, शांतीनगर डोंगरी, दहिसर-पूर्व), महेश अमरसिंग चौहाण ऊर्फ भांज्या (35, दहिसर-पूर्व, रावळपाडा) अशी मुंबईबाहेर तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

ही कारवाई मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारे सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर परिमंडळ-3चे उपायुक्त गजानन राजमाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

Comments are closed.