ईशान्य भारतातील संस्कृती, अस्मिता आणि सामाजिक वास्तवाचे दर्शन घडविणारे चित्रपट इफ्फीत; ‘रेड कार्पेट’ आणि ‘उरुम’ चित्रपटांतून आदिवासी परंपरा,भाषिक वारसा आणि मानवी भावनांचा वेध – TMarathiNews
पणजी : ईशान्य भारतातील समृद्ध सांस्कृतिक वारसा, आदिवासी अस्मिता आणि सामाजिक वास्तवाचे दर्शन घडविणारे दोन वेगळ्या धाटणीचे चित्रपट 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आसाममधील पारंपरिक हातमाग विणकामाची परंपरा जपण्यासाठी सुरू असलेला संघर्ष आणि अरुणाचल प्रदेशातील एका पित्याचा मुलीच्या निधनानंतरचा भावनिक व मानसिक प्रवास अशा दोन वेगळ्या विषयांवर हे चित्रपट भाष्य करतात. ऐमी बरुआ दिग्दर्शित आसामी माहितीपट ‘रेड कार्पेट’चा समावेश इंडियन पॅनोरमाच्या नॉन-फीचर विभागात, तर डुयू टॅब्यो दिग्दर्शित ‘उरुम’चा समावेश फीचर फिल्म विभागात करण्यात आला आहे.
या दोन्ही चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी गोव्यात आयोजित पत्रकार परिषदेत आपल्या चित्रपटांच्या निर्मितीप्रक्रियेविषयी आणि विषयांच्या निवडीमागील भूमिकेविषयी माहिती दिली. ‘रेड कार्पेट’ हा माहितीपट आसाममधील कार्बी आंगलाँग परिसरातील कार्बी समुदायाच्या पारंपरिक हातमाग विणकामाच्या वारशावर आधारित आहे. शतकानुशतके जपली गेलेली ही कला आधुनिकीकरण आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आव्हानांना सामोरी जात आहे. डोनकामोकाम या गावातील पारंपरिक विणकराचा प्रवास गावापासून थेट कान्स चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटपर्यंत पोहोचल्याची कहाणी या माहितीपटातून उलगडते. हाताने विणलेल्या वस्त्राचे सांस्कृतिक अस्मिता, अभिमान आणि आशेचे प्रतीक म्हणून झालेले रूपांतर यातून दाखविण्यात आले आहे.
पुरस्कारप्राप्त अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका ऐमी बरुआ यांनी पारंपरिक हातमागावर तयार केलेल्या वस्त्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या ओळखीविषयी सांगितले. स्थानिक विणकरांचे कौशल्य आणि त्यांच्या वस्त्रांमध्ये सामावलेली सांस्कृतिक ओळख जगासमोर आणण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. पारंपरिक विणकामाची कला जपण्याची गरज अधोरेखित करताना तरुण पिढीने आपल्या भाषा, संस्कृती आणि परंपरांचा अभिमान बाळगून हा वारसा पुढे नेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दुसरीकडे, डुयू टॅब्यो दिग्दर्शित ‘उरुम’ हा चित्रपट शोक, स्मृती आणि आदिवासी श्रद्धा-समजुतींचा वेध घेतो. अरुणाचल प्रदेशातील दुर्गम पर्वतीय भागातील एका पित्याच्या आयुष्याभोवती या चित्रपटाची कथा फिरते. आपल्या लहान मुलीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर अपराधीपणा, अस्वस्थ करणाऱ्या आठवणी आणि मानसिक संघर्षात अडकलेल्या या पित्याचा सत्य आणि मनःशांतीच्या शोधातील प्रवास चित्रपटातून मांडण्यात आला आहे.
बालपणी झिरो येथे पाहिलेल्या एका घटनेने या चित्रपटाची प्रेरणा मिळाल्याचे दिग्दर्शक डुयू टॅब्यो यांनी सांगितले. मुलीच्या निधनानंतर एका पित्याला करावा लागणारा मानसिक आणि भावनिक संघर्ष त्यांनी जवळून पाहिला होता. ही आठवण अनेक वर्षे त्यांच्या मनात राहिली आणि पुढे ‘उरुम’च्या कथानिर्मितीचा आधार ठरली. विशिष्ट नैतिक संदेश देण्याऐवजी दुःखाचा सामना करणाऱ्या पित्याची मानसिक अवस्था आणि भावविश्व मांडण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इफ्फीमध्ये चित्रपटाची निवड होणे ही अरुणाचल प्रदेशातील उदयोन्मुख चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाची दखल असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘उरुम’ हा चित्रपट स्थानिक निशी भाषेत तयार करण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतल्याचे टॅब्यो यांनी सांगितले. स्थानिक भाषेतील अस्सलपणा जपण्यासोबतच निशी समुदायाच्या भाषिक वारशाला अधिक दृश्यमानता मिळवून देणे हा त्यामागील उद्देश आहे. तरुण पिढीचा आपल्या मातृभाषांशी संपर्क कमी होत असल्याची खंत व्यक्त करत, स्थानिक भाषा, संस्कृती आणि जीवनपद्धतीचे दस्तऐवजीकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
ईशान्य भारत हा चित्रपट निर्मितीसाठी अद्याप मोठ्या प्रमाणात न उलगडलेला प्रदेश असून, तेथील कथा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता असल्याचे टॅब्यो यांनी सांगितले. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून सामाजिक जाणीव आणि परिवर्तन घडविण्याचे प्रभावी साधन ठरू शकते, असेही ते म्हणाले. ‘रेड कार्पेट’ आणि ‘उरुम’ या दोन्ही चित्रपटांतून ईशान्य भारतातील विविध सांस्कृतिक अनुभव, आदिवासी परंपरा, भाषिक अस्मिता आणि समकालीन सामाजिक वास्तवाचे दर्शन घडते. या चित्रपटांच्या समावेशामुळे 57व्या इफ्फीच्या चित्रपट वैविध्यात मोलाची भर पडली आहे.
Comments are closed.