एक इंचही जमीन गेली नाही.

निवृत्त भूसेना प्रमुख मनोज नरवणे यांचे प्रतिपादन : भारताने लडाख संघर्ष अत्यंत उत्कृष्टरित्या नियंत्रणात ठेवल्याने यशस्वी

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

लडाख येथे चीनसमवेत झालेल्या संघर्षात भारताने आपली एक इंचही भूमी गमावलेली नाही, अशी स्पष्टोक्ती निवृत्त भूसेना प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी केली आहे. ते एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला मुलाखत देत होते. नरवणे यांनी एक पुस्तक लिहिले असून ते अद्याप प्रसिद्ध झालेले नाही. काही महिन्यांपूर्वी या पुस्तकावरून मोठा वाद घडला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या पुस्तकाचा आणि त्यातील काही आशयाचा उल्लेख लोकसभेत करून केंद्र सरकारवर टीका केली होती. तथापि, आता स्वत: नरवणे यांनीच स्थिती स्पष्ट केली असून विरोधकांच्या आरोपांमधील आणि टीकेतील हवा काढून घेतली आहे.

या पुस्तकाविषयीही नरवणे यांनी या मुलाखतीत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. हे पुस्तक पूर्णपणे माझ्या स्वत:च्या विचारांवर आधारित आहे. हे पुस्तक लिहिताना मी कोणतीही गुप्त सरकारी कागदपत्रे पाहिलेली नाहीत. त्यामुळे या पुस्तकात कोणतेही गौप्यस्फोट नाहीत. भारताचा सैनिक या नात्याने मला जे अनुभव आलेले आहेत तसेच जी सामरिक आव्हाने मला स्वीकारावी लागली, त्यांच्यासंबंधी हे पुस्तक आहे, असे स्पष्ट प्रतिपादन करत त्यांनी या पुस्तकाला वादात ओढणाऱ्यांच्या संबंधी तीव्र नाराजी व्यक्त केली. भारत-चीन यांच्यात 2020 मध्ये लडाख सीमेवर घडलेल्या संघर्षाचीही वस्तुस्थिती त्यांनी स्पष्ट केली.

केंद्र सरकारचा पूर्ण विश्वास

भारतीय सेनेचा चीनशी जेव्हा संघर्ष झाला, तेव्हा नरवणे स्वत: भूसेना प्रमुख होते. त्यावेळी केंद्र सरकारने भारतीय सेनेवर पूर्ण विश्वास टाकला होता. चीनशी दोन हात करण्यासाठी केंद्र सरकारने सेनेला पूर्ण मोकळीक आणि स्वातंत्र्य दिले होते. संकट दूर करण्यासाठी जी कार्यवाही योग्य आहे, ती करा, अशी स्पष्ट सूचना केंद्र सरकारने दिली होती. या सूचनेचा अर्थ असा आहे, की केंद्र सरकारने भारतीय सेनेला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. या संघर्षाच्या संपूर्ण कालावधीत केंद्र सरकार आणि भारतीय सेना यांच्यात सतत संपर्क होता. सेनेने जे केले, त्याला केंद्र सरकारचे पूर्ण समर्थन होते. त्यामुळे या संदर्भात अपसमज पसरविणे योग्य नाही, असेही ठाम प्रतिपादन नरवणे यांनी या प्रदीर्घ मुलाखतीत केलेले आहे.

नाही गमावली भूमी

या संघर्षात भारताची भूमी चीनने हिसकावली, असा अपप्रचार काही जणांकडून केला जात आहे. तथापि, हा प्रचार धादांत खोटा आहे. या संघर्षात भारताने एक इंचही भूमी गमावलेली नाही. उलट आम्ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती पूर्णत: नियंत्रणात ठेवली होती. भारताच्या सर्व भूमीचे रक्षण आम्ही केले आहे. तिचा कोणताही भाग चीनला घेऊ दिलेला नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी स्पष्ट केली.

चीनला हटावे लागले मागे

भारताने हा संघर्ष अत्यंत धीरोदात्तपणे हाताळला. आमची सेना चिनी सेनेच्या डोळ्याला डोळा भिडवून या संपूर्ण काळात उभी राहिली. चीनशी सेनापातळीवरची चर्चाही होत राहिली. अखेर चर्चेला यश आले. चीनने आपल्या चौक्या आणि इतर अस्थायी बांधकामे तोडली आणि त्याची सेना संघर्षपूर्व स्थितीत गेली, हे साऱ्या जगाने पाहिलेले आहे. अखेर चीनला मागे हटावे लागले आहे आणि भारताची स्थिती अत्यंत मजबूत राहिली आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. त्यामुळे कोणीही कोणाची दिशाभूल करू नये, अशी स्पष्ट सूचना नरवणे यांनी केली आहे.

Comments are closed.