घरात बोलण्याची परवानगी नाही: राहुल गांधी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

संसदेत विरोधी पक्षांच्या खासदारांना बोलू दिले जात नाही, अशी तक्रार काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या वर्षाकालीन अधिवेशनाला प्रारंभ होत असताना केली आहे. मी विरोधी पक्षनेता असूनही मला बोलण्यास अनुमती मिळत नाही. संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांना मात्र, त्यांचे म्हणणे मांडण्याची अनुमती देण्यात येते, असे प्रतिपादन त्यांनी सोमवारी केले.

संसदेच्या वर्षाकालीन अधिवेशनाला सोमवारपासून प्रारंभ झाला. मात्र, प्रथम दिवशीच या अधिवेशनाची गत काय होणार आहे, याची चुणूक पहावयास मिळाली आहे. हा प्रथम दिवस, घोषणाबाजी, कामकाजातील व्यत्यय, विरोधकांचा सभात्याग आदी कामकाजबाह्या घटनांनी गाजल्याचे पहावयास मिळाले.

पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जुलैला मालदीव आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर गांधी यांनी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ काही क्षण संसदेत दिसले. त्यानंतर त्यांनी त्वरित संसदेतून काढता पाय घेतला. संसद अधिवेशन होत असताना त्यांनी परदेश दौरा आयोजित केला आहे. संसदेत विरोधी पक्ष नेत्यांची गळचेपी केली जात आहे. त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो. हे अयोग्य आहे, अशी टीका त्यांनी केली.

प्रियांका गांधी यांचाही सुरात सूर

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनीही संसदेबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी यांना बोलू न दिल्यासंबंधी टीका केली. सरकारचे नेते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांना प्रत्युत्तर देण्याचा अधिकार विरोधी नेत्यांचा असतो. त्यामुळे त्यांना बोलू देणे आवश्यक आहे. तथापि, संसदेत सत्ताधारी पक्ष लोकशाहीचे पालन करत नाही. विरोधी पक्षांवर अन्याय केला जातो, असे प्रतिपादन त्यांनी केले.

‘सिंदूर’ अभियानावर चर्चेची मागणी

केंद्र सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पाकिस्तानविरोधात केलेल्या ‘सिंदूर’ अभियानावर त्वरित चर्चा घडवून आणावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केली आहे. लोकसभेत या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभाध्यक्षांच्या आसनाजवळ धरणे धरले. सभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना चर्चा करण्यात येईल असे आश्वासन दिले. तरीही विरोधी पक्षांचे समाधान झाले नाही. त्यांनी घोषणा देण्यास प्रारंभ केला. त्यामुळे कामकाज चालविणे अशक्य झाल्याने संसदेची कार्यवाही दिवसभरासाठी थांबविण्यात आली.

Comments are closed.