सध्या तरी नाही… असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी निवृत्तीच्या अफवांवर सोडले मौन
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांसह नेटकऱ्यांचेही लक्ष असते. मात्र, नुकत्याच केलेल्या एका पोस्टमुळे अमिताभ बच्चन निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या चर्चांनंतर आता खुद्द अमिताभ बच्चन यांनी स्पष्टीकरण देत निवृत्तीच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
अमिताभ बच्चन यांनी ‘X’ (ट्विटर)वर केलेल्या एका पोस्टमध्ये ‘उशीर झाला आहे, निवृत्त होण्याची वेळ आली आहे’ अशा आशयाचे वक्तव्य केले होते. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अमिताभ बच्चन अभिनय आणि सूत्रसंचालनाच्या क्षेत्रातून निवृत्ती घेण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
मात्र, अमिताभ यांनी आपल्या खास शैलीत या चर्चांचे स्पष्टीकरण दिले. त्यांनी स्पष्ट केले की, आपल्या पोस्टमध्ये ‘रिटायर’ हा शब्द त्यांनी कामातून कायमची निवृत्ती घेण्याच्या अर्थाने नव्हे, तर दिवसाची सांगता करून झोपायला जाण्याच्या अर्थाने वापरला होता. “जी नहीं हुजूर, मैं काम से रिटायर नहीं हो रहा हूँ; अंगरेजी में इसका मतलब होता है मैं अब सोने जा रहा हूँ,” असे अमिताभ बच्चन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला, असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
दरम्यान, अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या १८व्या पर्वाचे सूत्रसंचालन करत आहेत. वयाची ८३ वर्षे पूर्ण करूनही ते मनोरंजन विश्वात सक्रिय असून, त्यांच्या कामाचा सिलसिला अद्याप सुरूच आहे.
Comments are closed.