शुबमन गिल नको! 'या' खेळाडूकडे असावी वनडे कर्णधारपदाची धुरा, माजी खेळाडूने केली मोठी मागणी

भारतीय संघ सध्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे. ज्येष्ठ खेळाडू निवृत्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना तरुण खेळाडू जबाबदारी सांभाळताना दिसत आहेत. रोहित शर्मा जर लवकरच वनडे फॉरमॅटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला, तर त्यांच्या जागी नवा कर्णधार शोधावा लागेल. सध्या या रेसमध्ये शुबमन गिल आघाडीवर असल्याचे दिसते. मात्र, एका माजी भारतीय खेळाडूचे मत आहे की गिलऐवजी सीएसके फ्रेंचायझीचा हा खेळाडू कर्णधारपदासाठी योग्य ठरू शकतो.

टेस्टसोबतच आता शुबमन गिलला वनडे फॉरमॅटमध्येही रोहित शर्माचा उत्तराधिकारी मानलं जात आहे. मात्र, माजी भारतीय खेळाडू एस. बद्रीनाथ यांचे मत वेगळे आहे. बद्रीनाथ यांनी गट फीलिंग या शोवर सांगितलं, “जर रोहित शर्मा निवृत्त झाला तर वनडे विश्वचषक 2027 साठी कर्णधारपद ऋतुराज गायकवाडलाच मिळायला पाहिजे. तो रोहित आणि विराट यांचे मिश्रण आहे.” मात्र सध्या गायकवाड संघाच्याही योजनांमध्ये नाही. ऋतुराजने आत्तापर्यंत 6 वनडे सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 19.16 च्या सरासरीने 115 धावा केल्या आहेत. त्यात एक अर्धशतकही समाविष्ट आहे.

सध्या आयसीसी रँकिंगकडे पाहिल्यास सलामीवीर शुभमन गिल वनडे फॉरमॅटमध्ये क्रमांक 1 फलंदाज आहे. रोहित दुसऱ्या स्थानावर तर विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे. गिल सातत्याने वनडे सामन्यांत चांगलं प्रदर्शन करत आहे. मात्र ऋतुराज गायकवाड आपली जागा अजून पक्की करू शकलेला नाही. तरीदेखील लिस्ट ए क्रिकेटमध्ये गायकवाडचं प्रदर्शन उल्लेखनीय राहिलं आहे. त्याने आत्तापर्यंत 86 लिस्ट ए सामने खेळले असून, 56.15 च्या सरासरीने 4324 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 16 शतके आणि 17 अर्धशतके ठोकली आहेत. यामधील त्याची सर्वोत्तम खेळी नाबाद 220 धावांची आहे.

Comments are closed.