मंत्री नितीन गडकरींच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम; ‘माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला’, कार्यालयाने दिले स्पष्टीकरण – TMarathiNews
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अलीकडील वक्तव्यावरून सुरू झालेल्या राजकीय चर्चांना आता त्यांच्या कार्यालयाने स्पष्टीकरण देत पूर्णविराम दिला आहे. गडकरी यांनी केलेले वक्तव्य राजकीय निवृत्तीशी संबंधित नसून, त्यांनी स्थापन केलेल्या मानकर ट्रस्टच्या सामाजिक कार्याबाबत होते, असे त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
काटोल येथे कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या एकलव्य एकल विद्यालयाच्या कार्यक्रमात गडकरी यांनी आपल्या कामाच्या पद्धतीबाबत भाष्य केले होते. “आता पूर्वीसारखे काम करता येत नाही, त्यामुळे नव्या पिढीने पुढे येऊन जबाबदारी स्वीकारावी,” असा आशय त्यांच्या वक्तव्यात होता.
या वक्तव्याचा राजकीय अर्थ लावत गडकरी आगामी काळात सक्रिय राजकारणातून दूर जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, गडकरी यांच्या कार्यालयाने ही शक्यता फेटाळून लावली आहे.
‘वक्तव्याचा मूळ संदर्भ वेगळा’
गडकरींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले की, त्यांच्या वक्तव्याचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही. आदिवासी भागांमध्ये एकलव्य एकल विद्यालये चालवणाऱ्या मानकर ट्रस्टच्या कामाच्या विस्तारासंदर्भात ते बोलत होते.
ट्रस्टचे काम पुढे नेण्यासाठी नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना अधिक जबाबदाऱ्या देण्याची आवश्यकता असल्याचे गडकरी यांनी सांगितले होते. त्यांच्या या विधानाचा मूळ संदर्भ बाजूला ठेवून त्याकडे राजकीय निवृत्तीचे संकेत म्हणून पाहिले गेले, असे कार्यालयाने स्पष्ट केले.
नव्या पिढीला संधी देण्यावर भर
गडकरी यांनी कार्यक्रमात आपल्या सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ अनुभवाचा उल्लेख करताना, तरुण पिढीने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले होते. जुन्या पिढीने मार्गदर्शकाची भूमिका बजावत नव्या कार्यकर्त्यांना पुढे जाण्यासाठी संधी द्यावी, असा त्यामागील उद्देश असल्याचे आता स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे गडकरी राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना तूर्तास ब्रेक लागला आहे.
केंद्रात महत्त्वाची भूमिका
नितीन गडकरी हे 2014 पासून केंद्र सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. रस्ते, महामार्ग आणि द्रुतगती मार्गांच्या प्रकल्पांमुळे त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
अलीकडच्या काळात इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या मुद्द्यावरूनही गडकरी चर्चेत राहिले आहेत. इथेनॉलच्या वापराचे ते सातत्याने समर्थन करत असून, त्याच्या वापराबाबत वाहनधारकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या काही प्रश्नांवरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
मात्र, गडकरी यांच्या ताज्या वक्तव्याचा या राजकीय विषयांशी संबंध नसून ते त्यांच्या सामाजिक संस्थेच्या कामकाजाच्या संदर्भात असल्याचे त्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
Comments are closed.