पश्चिम बंगालच्या सचिवांनी महुआ मोइत्रा यांना नोटीस बजावली.

कथित बदनामीकारण टिप्पणीप्रकरणी कारवाई

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालचे मुख्य सचिव मनोज अग्रवाल यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना इंटरनेट माध्यमांवर त्यांच्याविरुद्ध केलेल्या कथित बदनामीकारक टिप्पणीप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये बिनशर्त माफी आणि 10 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीची मागणी करण्यात आली आहे. तसेच कायदेशीर आणि इतर संबंधित खर्चासाठी 50,000 रुपयांची मागणीही करण्यात आली आहे.

नोटीस मिळाल्यापासून 24 तासांच्या आत दोन्ही पोस्ट काढून टाकण्यास आणि लेखी माफी मागण्यास महुआ मोईत्रा यांना सांगण्यात आले आहे. भविष्यात अशा कथित बदनामीकारक टिप्पण्या न करण्याचे लेखी हमीपत्र देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. मोईत्रा यांनी केलेल्या टिप्पण्यांमुळे त्यांची प्रतिष्ठा, सचोटी आणि व्यावसायिक प्रतिमेला हानी पोहोचल्याचा अग्रवाल यांचा दावा आहे.

आपल्या पोस्टमध्ये, महुआ मोईत्रा यांनी अग्रवाल यांच्यावर राज्यातील लाखो वैध मतदारांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून कथितपणे बेकायदेशीरपणे वंचित ठेवल्याचा आरोप केला आहे. अग्रवाल यांच्या वकिलांनी नोटीसमध्ये हे आरोप फेटाळून लावले असून, त्यांनी मतचोरी किंवा कोणतीही निवडणूक अनियमितता केली नसल्याचे म्हटले आहे. अग्रवाल यांनी तत्कालीन मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कायद्यानुसार आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार आपल्या अधिकृत कर्तव्यांचे पालन केल्याचे वकिलांनी स्पष्ट केले आहे.

Comments are closed.