कुख्यात माओवादी मारला गेला
वृत्तसंस्था/पाटणा (बिहार)
बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात एका कुख्यात माओवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. त्याच्यावर 50 हजार रुपयांचे इनाम होते. दयानंद मालकर असे त्याचे नाव असल्याची माहिती देण्यात आली आहे. तो सीपीआय माओवादी या संघटनेच्या उत्तर बिहार विभागाचा सचिव होता. या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. त्याच्या दोन सहकाऱ्यांना पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. तो छोटू या नावानेही प्रसिद्ध होता. त्याच्या नावावर 14 गुन्हे असून त्यासाठी तो पोलिसांना हवा होता. बिहार पोलिसांच्या विषेश कृती दलाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, त्याने गोळीबार केल्याने त्याच्यावरही पोलिसांनी गोळीबार केला. या चकमकीत तो ठार झाला आहे, अशी माहिती देण्यात आली.
गुप्त माहितीवरुन शोध
त्याचा ठावठिकाणा कोठे आहे, याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारावर त्याला ताब्यात घेण्याची योजना सज्ज करण्यात आली होती. बेगुसराय जिल्ह्यातील एका विशिष्ट स्थानी तो आपल्या सहकाऱ्यांसह लपलेला आहे, ही माहिती मिळताच पोलीसांच्या विशेष कृती दलाची एक तुकडी तेथे पोहचली. त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले होते. तथापि, ते धुडकावून त्याने पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे त्याचा एन्काऊंटर करण्यात आला असे पोलिस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गंभीर जखमी
पोलिसांनी प्रत्युत्तरासाठी केलेल्या गोळीबारात मालकर हा प्रथम गंभीर जखमी झाला होता. त्याला त्वरित उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. तथापि, उपचार केले जात असताना त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. पोलिसांशी चकमक होत असताना त्याचे काही सहकारी पळून गेले अशीही अनधिकृत माहिती आहे. मात्र, त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी केली जात आहे, अशी माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली आहे.
शस्त्रे, साधने हस्तगत
मालकर आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून पोलिसांनी एक रायफल, देशी बनावटीचे एक पिस्तुल, 25 जिवंत काडतुसे आणि काडतुसांच्या 15 पुंगळ्या (उपयोगात आणलेली काडतुसे) हस्तगत करण्यात आली आहेत. मालकर हा उत्तर बिहारमधील अनेक नक्षली हिंसाचार प्रकरणांमध्ये समाविष्ट होता. गेली 4 वर्षे त्याने पोलिसांना गुंगारा देण्यात यश मिळविले होते, असे स्पष्ट करण्यात आले.
Comments are closed.