38 वर्षांचा जोकोविच अजूनही तगडा! विम्बल्डनमध्ये अशी कामगिरी फक्त दिग्गजांनाच जमते

विम्बल्डन 2025 स्पर्धेत सर्बियाचा अनुभवी टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. 38 वर्षीय जोकोविचने तिसऱ्या फेरीत आपल्या देशबांधव मिओमिर केकमानोविचचा 6-3, 6-0, 6-4 असा सहज पराभव करत विम्बल्डनमधील आपला 100वा विजय नोंदवला.

या कामगिरीसह तो विम्बल्डनच्या इतिहासातील केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे, ज्याने 100 सामने जिंकले आहेत. यापूर्वी महिला गटात मार्टिना नवरातिलोवा (120 विजय) आणि पुरुष गटात रॉजर फेडरर (105 विजय) यांनी ही कामगिरी केली होती.

जोकोविचने याआधी आपल्या 24 ग्रँड स्लॅमपैकी सात जेतेपदं ऑल इंग्लंड क्लबमध्ये जिंकली आहेत. गेल्या 8 वर्षांत विम्बल्डनमध्ये त्याने केवळ एकच सामना गमावला आहे, तोही कार्लोस अल्काराझविरुद्ध. या विजयानंतर प्रतिक्रिया देताना जोकोविच म्हणाला, “माझ्या आवडत्या स्पर्धेत जेव्हा मी अशी कामगिरी करतो, तेव्हा त्या प्रत्येक क्षणासाठी मी खूप आभारी असतो.” आता पुढील फेरीत जोकोविचची लढत 11व्या मानांकित अ‍ॅलेक्स डी मिनॉरशी होणार आहे.

डबल्समध्ये युकी भांबरी-गॅलोवेची प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक
विंबलडन 2025 स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताचा युकी भांबरी आणि अमेरिकेचा रॉबर्ट गॅलोवे यांनी उत्तम प्रदर्शन करत प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

16व्या मानांकन असलेल्या या जोडीने दुसऱ्या फेरीत नूनो बोर्गेस (पोर्तुगाल) आणि मार्कोस गिरोन या जोडीचा 6-3, 7-6 (8-6) असा पराभव केला. या विजयामुळे ते स्पर्धेच्या अंतिम 16मध्ये पोहोचला आहे.

Comments are closed.