आता वादळी वाऱ्यात केळी पिकाचे नुकसान होणार नाही, बार्कने विकसित केले नवीन वाण

जोरदार वारे, पावसाळा आणि वारंवार होणारे पिकांचे नुकसान याला उपाय म्हणून भाभा अणुसंशोधन केंद्राने (BARC) तयार केलेली नवीन बुटकी केळीची जात ‘कावेरी वामन’ शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा ठरू शकते. भारतातील पहिलीच म्युटंट केळी अशी तिची नोंद झाली आहे. तसेच बार्कने विकसित करून बाजारात आणलेला हा पहिलाच फळवर्गातील म्युटंट प्रकार आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

औपचारिक नाव ‘ट्रॉम्बे बटन म्युटंट-9’ (TBM-9) असलेल्या या जातीला ‘कावेरी वामन’ असे नामकरण करण्यात आले आहे. ही जात लोकप्रिय ‘ग्रांडे नाइन’ या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या केळीपासून विकसित करण्यात आली आहे. बार्कच्या म्युटेशन ब्रिडिंग कार्यक्रमातून तयार झालेली ही 72 वी सुधारित पिकाची जात आहे.

बार्कच्या माहितीनुसार, कावेरी वामनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची कमी असलेली उंची, ज्यामुळे किनारपट्टीवरील प्रचंड वाऱ्यात होणारे झाड वाकण्याचे किंवा मोडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते. पारंपरिक केळी लागवडीत बांबू किंवा लाकडी आधार देण्यासाठी खर्च करावा लागतो. पण कमी उंची असलेली आणि वाऱ्याला प्रतिरोधक असल्याने कावेरी वामनमध्ये अशा आधारांची गरज नसते. त्यामुळे उत्पादन खर्चात थेट बचत होते.

मूळ ‘ग्रांडे नाइन’च्या तुलनेत या जातीचे पीक दीड महिना आधी तयार होते, म्हणजे शेतकऱ्यांना लवकर उत्पादन मिळते. चव, सुगंध आणि इतर गुणधर्म मात्र मूळ जातीसारखेच राहतात. घनदाट लागवड तसेच टेरेस गार्डनिंगसाठीही ही जात योग्य असल्याने व्यापारिक आणि घरगुती लागवडीला दोन्ही पातळ्यांवर मदत होईल, असे बार्कने सांगितले. अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अजीतकुमार मोहंती यांनी TBM-9 ला “अणुउर्जेद्वारे फळपिकांच्या सुधारासाठीचा महत्त्वाचा टप्पा” असे वर्णन केले.

कावेरी वामन ही जात बार्कने तिरुचिरापल्ली येथील ICAR-नॅशनल रिसर्च सेंटर फॉर बनाना यांच्या सहकार्याने विकसित केली आहे. गॅमा किरणांद्वारे ‘ग्रांडे नाइन’ मध्ये बदल घडवून अनेक वर्षांच्या चाचणीनंतर सर्व बाबतीत उत्तम ठरलेली ही जात बाजारात आणण्यात आली. बार्कचे संचालक विवेक भासिन यांनी सांगितले की, “फक्त पारंपरिक पिकांपुरता मर्यादित न राहता आता फळे आणि इतर वनस्पतींमध्येही म्युटेशन ब्रिडिंगचा विस्तार करत आहोत. कावेरी वामन हा त्याचा उत्तम नमुना आहे.”

Comments are closed.