माजी निवडकर्त्यांनी रोहित-विराटला दिला सल्ला! वर्ल्डकप 2027 साठी सांगितला यशाचा फॉर्म्युला!

रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma & Virat Kohli) 2027 चा वनडे विश्वचषक खेळणार का? हा प्रश्न सध्या जगभरातील सर्व क्रिकेट चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाकडून या प्रश्नाचे अधिकृत उत्तर अद्याप मिळालेले नाही. मात्र आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दल माजी निवडकर्त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. दोन्ही खेळाडूंच्या 2027 वर्ल्डकपमधील सहभागाबाबत माजी क्रिकेटपटूंनी महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे.

भारतीय संघाचे माजी निवडकर्ते संजय जगदाळे (Sanjay jagdale) यांनी सांगितले की, रोहित आणि विराट दोघेही पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी करणारे खेळाडू आहेत. पण जर तुम्ही नियमितपणे खेळत नसाल, तर त्याचा तुमच्या खेळावर परिणाम होतो. हेच धोनीसोबत आयपीएलमध्ये पाहायला मिळाले. ब्रायन लारा आणि मॅथ्यू हेडनलाही असाच अनुभव आला होता. अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर पूर्वीसारखे राहात नाहीत, हे नैसर्गिक आहे. मला त्यांना घरगुती क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला आवडेल. त्यांच्या मनात काय आहे हे मी सांगू शकत नाही, पण देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेणे त्यांच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल.

सध्या रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेचा भाग आहेत. पहिल्या सामन्यात दोघांची कामगिरी निराशाजनक ठरली. रोहित फक्त 8 धावा करून बाद झाला, तर विराट कोहली शून्यावर बाद झाला. मात्र दुसऱ्या सामन्यात दोघांकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

2027 च्या विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळतील की नाही, याबाबत साशंकता आहे. कारण सध्या दोघेही केवळ एका फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करत आहेत. टी-20 विश्वचषक 2024 नंतर रोहित आणि विराट यांनी टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली, आणि आयपीएल 2025 दरम्यान दोघांनी कसोटी क्रिकेटलाही अलविदा केले. त्यामुळे आता ते केवळ वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी खेळत आहेत.

Comments are closed.