आता आम्ही इस्रोबद्दल बोलू, नासा नाही!
अंतराळवीर शुभांशू शुक्लाचे वक्तव्य : ‘गृह’राज्य उत्तर प्रदेशमध्ये भव्य स्वागत
वृत्तसंस्था/ लखनौ
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून परतलेले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला सोमवारी प्रथमच त्यांचे मूळ गाव लखनौ येथे पोहोचले. येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्या सन्मानार्थ अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथील लोकांचे प्रेम आणि स्वागत पाहून सगळा थकवा गायब झाल्याची उत्स्फूर्त भावना शुभांशू यांनी व्यक्त केली.
शुभांशू शुक्ला यांचे सुरुवातीला विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत झाले. यावेळी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. विमानतळापासून गोमती नगरपर्यंत त्यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. हलक्या पावसातही हजारो लोक रस्त्यावर रांगा लावून उभे होते. एका बाहीवर भारतीय ध्वज आणि दुसऱ्या बाजूला इस्रोचे चिन्ह असलेले वायुसेनेचे तपकिरी रंगाचे जॅकेट परिधान करून शुभांशू शुक्ला प्रेक्षकांना हात दाखवत पुढे सरकत होते. रोड शो आटोपल्यानंतर शुभांशू शुक्ला यांच्या स्वागतानिमित्त गोमतीनगर एक्सटेंशन कॅम्पस ऑडिटोरियममध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी पत्रकार परिषद घेत अंतराळातील काही महत्त्वाच्या गोष्टींवर भाष्य केले. अंतराळातील प्रवास हा एक अलौकिक अनुभव असल्याचे सांगतानाच आता लोक ‘नासा’बद्दल नाही तर ‘इस्रो’बद्दल बोलतील, असे ते म्हणाले.
शुभांशू शुक्ला यांनी उत्तर प्रदेशात पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांचा पुन्हा सन्मान करण्यात आला. दोन वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडे ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ नावाची कोणतीही गोष्ट नव्हती. गेल्या दोन वर्षांपासून आपण ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ साजरा करत आहोत. पण यावेळी राष्ट्रीय अंतराळ दिनासाठी मी पाहिलेला उत्साह आणि जल्लोष पाहून मला पूर्ण आत्मविश्वास मिळाला असल्याचेही शुक्ला म्हणाले.
कुटुंबीयांसह मुख्यमंत्र्यांची भेट
आयएसएसच्या यशस्वी मोहिमेनंतर सोमवारी त्यांचे मूळ गाव लखनौ येथे आलेले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कुटुंबासह भेट घेतली. मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली. मुख्यमंत्री कार्यालयाने ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये देशाचे सुपुत्र शुभांशू शुक्लाजी यांनी ऐतिहासिक ‘अॅक्सिओम-4’ मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून सुरक्षित परतल्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनौ येथील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी सौजन्य भेट घेतल्याचे जाहीर केले. योगी यांच्या भेटीदरम्यान अंतराळवीर आणि ग्रुप कॅप्टन शुक्ला त्यांच्या पत्नी कामना आणि मुलगा कियाश त्यांच्यासोबत होते.
मुलांना पाहून थकवा गायब
सिटी मॉन्टेसरी स्कूलमधील त्यांच्या शाळेतील मुलांना संबोधित करताना ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला म्हणाले, ‘आज सकाळी मी खूप थकलो होतो. मग मी तुम्हा मुलांना रस्त्यावर पाहिले आणि मला सांगण्यात आले की तुम्ही सकाळी 7.30 वाजल्यापासून तिथे उभे आहात. मी तुम्हाला घाम फुटलेला, हसणारा आणि इतका उत्साहित पाहिले की माझा थकवा निघून गेला. यशस्वी होण्यासाठी फक्त प्रबळ इच्छाशक्तीची आवश्यकता असते. माझ्या एकूण अनुभवात, मला वाटते की भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. आपण योग्यवेळी योग्य संधी घेत आहोत. 2040 पर्यंत चंद्रावर उतरण्याचे आमचे एक स्वप्न आणि ध्येय असून तेसुद्धा पूर्ण होईल, असे ते म्हणाले.
आईला भेटल्यानंतर शुभांशू भावुक
अंतराळातून परतल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या गावी लखनौला पोहोचलेल्या शुभांशू शुक्ला यांच्या स्वागतादरम्यान आईला भेटल्यानंतर शुभांशू भावूक झाले. आई आणि मुलाने बराच वेळ एकमेकांना मिठी मारली. यावेळी दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. ही भेट विमानतळावर झाली. त्यांचे आई-वडील, पत्नी कामना आणि मुलगा कियाश यांच्यासह कुटुंबातील सदस्य त्यांचे स्वागत करण्यासाठी लखनौ विमानतळावर उपस्थित होते. शुभांशू शुक्ला 17 ऑगस्ट रोजी अमेरिकेतून भारतात आले होते. 18 ऑगस्ट रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसह अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यानंतर ते सोमवारी प्रथमच त्यांच्या गावी आले आहेत.
Comments are closed.