क्रीडानगरीतून – नुवान थुषारा न्यायालयात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान थुषारा याने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) नाकारल्यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाविरुद्ध (एसएलसी) कोलंबो जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला आहे. नव्या कडक फिटनेस चाचण्यांमध्ये अपयशी ठरल्यामुळे  एसएलसीने त्याला परवानगी नाकारली. थुषाराचा करार 31 मार्च 2026 रोजी संपला असून त्यानंतर एनओसी लागू करणे चुकीचे असल्याचा त्याचा दावा आहे. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग असला तरी या वादामुळे त्याचा आयपीएलमधील सहभाग धोक्यात आला आहे. या प्रकरणात एससलसीचे अध्यक्ष शम्मी सिल्हा यांच्यासह इतर अधिकाऱयांना प्रतिवादी करण्यात आले आहे. पुढील सुनावणी 9 एप्रिलला होणार असून तोपर्यंत थुषाराला किमान काही सामने गमवावे लागतील. आयसीसी नियमांनुसार परदेशी लीगसाठी एनओसी आवश्यक असते, मात्र त्यासाठीचे निकष बोर्ड ठरवतात.

ग्रेटर मुंबई पोलीसांचा  विजय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रॉफी आरसीएफ टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत ग्रेटर मुंबई पोलीस ‘ब’ संघाने सिप्ला संघावर 6 विकेट राखून विजय मिळवला.  चेंबूर येथील आरसीएफ मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा सिप्ला संघाचा निर्णय त्यांच्यावरच उलटला. कुशाग्र गुप्ता आणि शुभम ढाकणेच्या (प्रत्येकी 3 विकेट) प्रभावी गोलंदाजीमुळे त्यांचा डाव 16 षटकांत अवघ्या 106 धावांवर आटोपला.  ग्रेटर मुंबई पोलीस ‘ब’ संघाने माफक आव्हान 4 विकेटच्या बदल्यात पार केले. त्यात प्रज्ञेश लाडचे (50 धावा) सर्वाधिक योगदान राहिले. त्याने 37 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने अर्धशतकी खेळी साकारली.

राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेवर पावसाची चढाई

एकापेक्षा एक अशा प्रो कबड्डीपटूंचा सहभाग असलेल्या 73व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेवर अवकाळी आलेल्या पावसाने जोरदार चढाई करत कबड्डी मैदानाचा अक्षरशः चिखल केला. त्यामुळे स्पर्धेचा पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेला. दुसऱया दिवशी पावसाने विश्रांतीची कृपा केली, तर स्पर्धा तीन दिवसांत संपवण्याचे खडतर आव्हान आयोजक आणि राज्य कबड्डी संघटनेसमोर असेल. या स्पर्धेत राज्यातील पुरुषांचे आणि महिलांचे प्रत्येकी 25 संघ खेळणार आहेत.  सिन्नरच्या आडवा पट्टा येथे उभारलेल्या भव्य मैदानात पावसाच्या अनपेक्षित हजेरीमुळे स्पर्धेसाठी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. शुक्रवारीही पावसामुळे खेळ होऊ शकला नाही तर आयोजकांना ही स्पर्धा एखाद्या बंदिस्त मैदानात घेण्याची तयारी करावी लागेल अथवा ते शक्य न झाल्यास स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागेल. स्पर्धेबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसून परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असे राज्य कबड्डी संघटनेच्या सूत्रांनी कळवले आहे.

Comments are closed.