सेमीफायनलमध्ये पाकिस्तान कि न्यूझीलंड? मिचेल सॅंटनर म्हणाला, “इंग्लंडविरुद्ध आम्ही जिंकलो असतो तर…”

इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर न्यूझीलंडच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्यांचा कर्णधार मिचेल सॅंटनरने पुढील फेरीत पोहचण्याची संधी आम्ही गमावली, असे वक्तव्य केले आहे. या स्पर्धेत इंग्लंडने पहिले दोन सुपर-८ सामने जिंकत उपांत्य फेरीत जागा पक्की केली होती. आता त्यांच्या आणखी एका विजयाने पाकिस्तानसाठीही पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यासाठी पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय आवश्यक आहे.

“तो एक उत्तम सामना होता. तो आम्ही जिंकला असता तर निश्चितच आमच्या उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग सोपा झाला असता. फलंदाजी आणि गोलंदाजीने संघाचा निकाल पालटू शकतो, असे अनेकवेळा घडते “, असे सॅंटनरने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर म्हटले आहे.

यावेळी इंग्लंड ज्याप्रकारे खेळला, त्या तुलनेत न्यूझीलंड कमी पडला, अशी खंतही सॅंटनरने व्यक्त केली आहे. तो म्हणाला, “आम्ही एक चांगले लक्ष्य त्यांच्यासमोर ठेवले होते. इंग्लंड उत्तम खेळला. शेवटच्या काही षटकात अधिक धावा केल्या असत्या तर चांगले झाले असते. त्या चार षटकात आम्ही विकेट्स गमावल्याने अधिक धावा झाल्या नाहीत. १७०, १७५ धावसंख्या उत्तम लक्ष्य ठरले असते.”

इंग्लंडच्या विजयाने पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचे दार पुन्हा एकदा खुले आले आहे. यामध्ये त्यांनी प्रथम फलंदाजी घेत तो सामना ६५ धावांनी जिंकला आणि १३.१ षटकात लक्ष्याचा पाठलाग केला तर त्यांचा नेट रनरेट न्यूझीलंडपेक्षा चांगला होईल.

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली होती. त्यांनी २० षटकात ७ विकेट्स गमावत १५९ धावा केल्या होत्या. यामध्ये ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ३९ धावा केल्या. इंग्लंडने हे लक्ष्य शेवटच्या षटकात ४ विकेट्स शिल्लक राखत पार केले. त्यांच्या या विजयात महत्वाची कामगिरी लेग-स्पिनर रेहान अहमदने केली. त्याने गोलंदाजीवेळी ३ षटकात २८ धावा देत २ विकेट्स घेतल्या आणि लक्ष्याचा पाठलाग करताना ७ चेंडूत नाबाद १९ धावा काढल्या.

या स्पर्धेत ग्रुप-२ मधील इंग्लंडने सुपर-८चे तिन्ही सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. न्यूझीलंडचे सुपर-८चे तीन सामने झाले असून पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाला, श्रीलंकेविरुद्ध विजय आणि इंग्लंडविरुद्ध पराभव झाल्याने त्यांचे केवळ ३ गुण झाले आहेत. पाकिस्तानचे दोन सामन्यात एक गुण आहेत तर श्रीलंका आधीच बाहेर झाला आहे. अशात पाकिस्तानला उपांत्य फेरीत जाण्यासाठी आजच्या (२८ फेब्रुवारी) सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विजय आवश्यक आहे.

Comments are closed.