गोवेकरांच्या नशासाठी ओडिशाचा गांजा; दोन तस्कर जेरबंद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ओडिशाहून ठाणेमार्गे गोवेकरांच्या नशासाठी घेऊन जाणाऱ्या दोन गांजा तस्करांना अखेर जेरबंद करण्यात आले आहे. यामध्ये तब्बल २१ किलोचा गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. कल्याण रेल्वे पोलीस आणि आरपीएफ यांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये विकी कुमार (२१) आणि कुलदीप मंडल (२३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कोणार्क एक्स्प्रेसमधून त्यांना ताब्यात घेतले असून पोलीस तपास करत आहे.

सोमवारी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास कोणार्क एक्स्प्रेस नेहमीप्रमाणे कल्याण रेल्वे स्थानकावर आली होती. यावेळी एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ आणि कल्याण रेल्वे पोलिसांचे संयुक्त गस्ती पथक तपासणी करत होते. गस्तीदरम्यान एक्स्प्रेसमधील दोन युवक संशयास्पद हालचाली करताना पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावेळी पोलिसांनी तात्काळ दोघांची चौकशी करून त्यांच्याकडे असलेल्या साहित्याची झडती घेतली. झडतीदरम्यान त्यांच्या बॅगांमध्ये २१ किलो गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही तात्काळ उचलले.

Comments are closed.