एका लाथेत ‘विकास’ आडवा, मुख्यमंत्र्यांचा अपमान होताच अधिकारी पुलावर; मुजोर गुत्तेदार म्हणाला, अजून काम अर्धवटच आहे
आमदार-खासदार फोडण्यात फडणवीस सरकारचा हात कोणी धरणार नाही; पण विकासाच्या बाबतीत हे सरकार एकदम बोगस ! ४८ लाख रुपये खर्चुन बांधण्यात येत असलेल्या पुलाचे निकृष्ट काम जागरूक नागरिकाने एका लाथेत पाडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेचा भरबाजारी लिलाव केला होता. पुलाच्या कामातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याने मुख्यमंत्र्यांचा अपमान होताच जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी करून गुत्तेदाराला जाब विचारला. त्यावर मुजोर गुत्तेदाराने ‘अजून काम अर्धवटच आहे’ असे सरकारच्या प्रतिष्ठेला साजेसे उत्तर दिले!
सध्या गल्ली ते दिल्ली विकासाच्या नावाखाली फक्त बोगसगिरी चालू आहे. मिसिंग लिंक, नांदेडातील ढासळलेल्या उड्डाणपुलाने सरकारची अब्रू चव्हाट्यावर आणली. भ्रष्टाचाराबद्दल जाब विचारणाऱ्यांनाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘कुत्ता, भाडे के टट्टे’ असे हिणवले. मुख्यमंत्री विधिमंडळात बोलत असतानाच नांदेडात उड्डाणपुलाचा भराव ढासळला. त्यानंतर केज तालुक्यातील बनकारंजा येथील पुलाच्या बोगस कामाने सरकारची प्रतिष्ठा एका लाथेत उडवली. पुलावर लावण्यात आलेले सिमेंटचे कठडे दुर्गादास लांब या तरुणाने फुटबॉलसारखे एका किकमध्ये उडवले. या कामात मुरुमाऐवजी माती आणि सिमेंटऐवजी मुरूम वापरल्याचे दिसून आले. पुलाला ठिकठिकाणी भगदाडं पडली आहेत. बांधकामासाठी अंथरलेल्या नळ्याही फुटल्या आहेत. नाल्याला पूर आला तर अख्खा पूलच वाहून जाण्याची भीती आहे.
गावातील काही तरुणांनी या बोगसगिरीचा पर्दाफाश केला. एका लाथेत पुलाचे कठडे पाडल्याचा व्हिडीओ या तरुणांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना पाठवला. ‘एका लाथेत विकास पाडला’ अशा आशयाचे वृत्त ‘सामना’मध्ये प्रसिद्ध होताच एकच खळबळ उडाली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले.
पुलाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव हे थेट पुलावर दाखल झाले. संबंधित गुत्तेदारालाही बोलावून घेण्यात आले. गावकऱ्यांनी पुलाच्या निकृष्ट कामाचे वाभाडे काढताच गुत्तेदाराने ‘अजून काम पूर्णच झाले नाही’ अशी मग्रुरीची भाषा वापरली. त्यामुळे संतापलेल्या जाधव यांनी गुत्तेदाराला गावकऱ्यांसमक्ष झापले. पुलाचे काम दर्जेदार झाले तरच कामाचे बिल देणार असल्याचेही जाधव यांनी ठणकावून सांगितले.
Comments are closed.