ऍंडरसन किंवा ब्रॉड नव्हे! इंग्लंडच्या 149 वर्षांच्या कसोटी इतिहासात ऑली रॉबिन्सन 'अशी' कामगिरी करणारा पहिला गोलंदाज

आयपीएल 2026 च्या धूमधामनंतर कसोटी क्रिकेट परतले आहे. क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स ग्राउंडवर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेला गुरूवारी (4 जून) सुरूवात झाली. यामध्ये दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाजांनी कहर कामगिरी करत फलंदाजांना अधिक काळ खेळपट्टीवर टिकूच दिले नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनने एका डावाच्या पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेत इतिहास रचला आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली. पहिल्या दिवशी एकूण 201 धावा झाल्या आणि 16 विकेट्स पडल्या. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 140 धावसंख्येवर सर्वबाद झाला, दुसरीकडे न्यूझीलंडच्या पहिल्या डावाचीही सुरूवात अडखळत झाली. त्यांनी 61 धावांवरच 6 विकेट्स गमावल्या. रॉबिन्सनच्या भेदक माऱ्यामुळे यजमानांना सामन्यात परतण्यास मदत झाली.

फेब्रुवारी 2024 नंतर आपला पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या रॉबिन्सनने सहा षटकांत 10 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याने आपल्या डावाच्या पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर डेव्हॉन कॉनवे, पाचव्या चेंडूवर केन विलियमसन आणि सहाव्या चेंडूवर रचिन रवींद्र यांच्या विकेट्स घेतल्या. ही कामगिरी करताच त्याने कसोटी इतिहासातील अनोख्या मोजक्या गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे. त्याच्याआधी डावाच्या पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेण्याची कामगिरी सहा खेळाडूंनी केली आहे, मात्र त्यामध्ये एकही इंग्लिश खेळाडू नव्हता.

डावाच्या पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेण्याची कामगिरी पहिल्यांदा श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाजी नुवान झोयसा याने केली होती. त्याने 1999 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ही कामगिरी केली होती. भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाणने 2006 मध्ये कराची येथे पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच षटकात सलमान बट, युनिस खास आणि मोहम्मद युसुफ यांना बाद करत झोयसाच्या विक्रमाची बरोबरी केली होती.

कसोटी डावाच्या पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेण्याच्या यादीत न्यूझीलंडचा डॅनियल व्हेट्टोरी, पाकिस्तानचा हॅरिस सोहेल, ऑस्ट्रेलियाचे मिचेल स्टार्क आणि स्कॉट बोलंड यांचा समावेश आहे.

Comments are closed.