वेळेत तक्रार करुनही कारवाई नाही, तुळजापुरातील 6000 बोगस मतदारांबाबत ओमराजेंचा आयुक्तांना सवाल
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने तुळजापूर येथील बोगस मतदार नोंदणी प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. तुळजापूर (Dharashiv) मतदारसंघाच्या बोगस मतदान नोंदणी प्रकरणात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje nimbalkar) यांच्या पत्रकार परिषदेनंतर निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं. तुळजापुरात विधानसभा निवडणुकीपूर्वी ऑनलाइन पद्धतीने 6 हजार बोगस मतदार नोंदणीचा प्रयत्न झाला होता. मतदार नोंदणी केलेले मतदार हे तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या मुंबई येथील तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजशी संबंधित असल्याचा ओमराजे निंबाळकर यांचा आरोप आहे. त्याच, अनुषंगाने पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. आता, केंद्रीय निवडणूक आयोगाने (Voting) अहवाल मागवला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी चावडी वाचनादरम्यान 6 हजार बोगस मतदार नोंदणी अर्ज आढळले होते. निवडणूक विभागाने विधानसभा निवडणुकीपूर्वीच ऑनलाइन नोंदणी केलेले अर्ज बाद करण्यात आले होते. निवडणूक अधिकाऱ्यांकडून नऊ महिन्यांपूर्वी त्याबाबत तुळजापूर पोलिसात तक्रार देण्यात आली. बोगस मतदार नोंदणी प्रयत्नात गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी कुठलाही तपास केला नसल्याचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला होता. तसेच, बोगस मतदार नोंदणी अर्जबाबत खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक झाल्याचंही दिसून आलं. त्यानंतर, आता केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई सुरू केली आहे.
एका गावात बोगस मतांची नोंदणी झाल्याचं आमच्या एका पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्याने तक्रार केली होती. त्या तक्रारीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी गावोगावी चावडी वाचन केल्यावर 6 हजार बोगस मतदार वाढल्याच लक्षात आलं. 9 महिने आधी निवडणूक आयोगाने तक्रार करून देखील अद्याप पर्यंत कारवाई झाली नाही, यात शून्य तपास आहे. या वाढलेल्या बोगस मतांमध्ये तेरणा इंजिनियरिंग कॉलेज आणि बाकीही काही कॉलेजचे विद्यार्थी आहेत, अशी माहिती निंबाळकर यांनी दिली. तसेच, राहुल गांधी करत असलेले आरोप बरोबर आहेत. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात असे प्रकार झाले आहेत. निवडणूक आयोग म्हणते, वेळेत का तक्रार केली नाही. यात तर वेळेत तक्रार केली, तेही तत्कालीन निवडणूक अधिकारी यांनीच. पण कारवाई का केली नाही? असा सवालही ओमराजे निंबाळकर यांनी निवडणूक आयुक्तांनाच केला आहे.
राहुल गांधींना टॅग करुन माहिती दिली
दरम्यान, मी आज राहुल गांधी यांना माझं ट्विट टॅग केलंय, त्यांच्याकडेही कागदपत्र देणार आहे. देशाच्या निवडणूक आयुक्तांकडे मी तक्रार केली आहे आणि कारवाईची मागणी केलीय. पण, कारवाई कशी होईल? पाठीशी कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे, असेही निंबाळकर यांनी म्हटले.
हेही वाचा
मोठी बातमी! सरकारी नोकरदांराना खुशखबर, 5 दिवस आधीच पगार मिळणार; आर्थिक तंगी होऊ नये म्हणून निर्णय
आणखी वाचा
Comments are closed.