ओमानजवळ हिंदुस्थानी खलाशांच्या जहाजावर हल्ला, दहा जणांना वाचवले; एक बेपत्ता
इराण आणि अमेरिकेत पुन्हा युद्ध भडकल्यानंतर ओमानच्या किनारपट्टीजवळ हिंदुस्थानी खलाशी असलेल्या एका व्यापारी जहाजावर हल्ला करण्यात आला. ‘जीएफएस गॅलेक्सी’ असे या जहाजाचे नाव असून त्यावर 11 हिंदुस्थानी खलाशी होते. त्यापैकी 10 जणांना वाचविण्यात यश आले असून एक जण बेपत्ता आहे. या हल्ल्याचा हिंदुस्थानने निषेध केला. जहाजांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत थांबले पाहिजेत, अशी भूमिका हिंदुस्थानने घेतली आहे.
‘जीएफएस गॅलेक्सी’ या मालवाहू जहाजावर 12 हिंदुस्थानी खलाशांसह एकूण 23 खलाशी होते. त्यापैकी 22 जणांना ओमानच्या नौदलाने वाचविले आहे. हे जहाज सायप्रसचे ध्वजांकित जहाज आहे. हे जहाज नियमांचे उल्लंघन करून जात असल्यामुळे हल्ला केल्याचा दावा इराणच्या सैन्याने केला आहे. सुरुवातीला जहाज कोणत्या देशाचे होते, याबाबत माहिती देण्यात आली नाही. मात्र, बचावकार्यानंतर त्याबाबत माहिती उघड झाली. हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली आणि खलाशांना जहाज सोडावे लागले. या जहाजावर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने इराणवर मोठे हल्ले केले.
हिंदुस्थानकडून निषेध
हिंदुस्थानने या हल्ल्याचा निषेध करत एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, ओमानमधील आमचे दूतावास परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि सुरू असलेल्या शोध व बचाव मोहिमेत ओमानच्या अधिकाऱ्यांशी सक्रियपणे समन्वय साधत आहे. आम्ही ओमानच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो. होर्मुझची सामुद्रधुनी आणि लागून असलेल्या भागात व्यापारी जहाजांवर होत असलेले हल्ले वाढत आहेत. वाढलेला तणाव त्वरित कमी करायला हवा. सध्या सुरू असलेल्या चर्चा तर्कसंगत आणि शांततापूर्ण तोडग्यापर्यंत जाणे अतिशय आवश्यक आहे, असे हिंदुस्थानने म्हटले आहे.
अमेरिकेने इराणवर फोडले खापर
अमेरिकेने ‘जीएफएस गॅलेक्सी’ जहाजावर झालेल्या हल्ल्यासाठी इराणला दोषी ठरवले. इराणने अतिशय बेजबाबदारपणे जहाजावर हल्ला केला. इराणला शांतता कराराचे पालन करत असल्याचे दाखवण्याची चांगली संधी होती. मात्र, इराणने ती गमावली, असे अमेरिकेच्या सेंट्रर कमांडने म्हटले आहे. तर, इराणने या जहाजाला इशारा देण्यासाठी गोळीबार केल्याचा दावा केला आहे.
Comments are closed.