पहिल्यांदाच आशिया कपमध्ये दाखल होणार हा संघ, भारताच्या गटात समावेश; खेळलेत इतके टी20 सामने
यंदाचे आशिया कपचे यजमानपद भारताकडे असले तरी स्पर्धा न्यूट्रल व्हेन्यूवर म्हणजेच यूएईमध्ये रंगणार आहे. टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी सर्व संघांना तयारीसाठी ही मोठी संधी मिळणार असून यंदाच्या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, यूएई, ओमान आणि हाँगकाँग असे एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत.
पहिल्यांदाच ओमानचा संघ या प्रतिष्ठित स्पर्धेत खेळणार आहे. एसीसी प्रीमियर कपमध्ये दमदार कामगिरी करून त्यांनी आशिया कपसाठी पात्रता मिळवली. बहरीन, कंबोडिया, यूएई आणि कुवैतचा पराभव करत त्यांनी सेमीफायनल गाठला. त्यानंतर हाँगकाँगवर विजय मिळवत अंतिम फेरीत मजल मारली. जरी अंतिम सामन्यात त्यांना यूएईकडून 55 धावांनी पराभव पत्करावा लागला, तरी पॉइंट्स टेबलवर दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याने त्यांना आशिया कप 2025 साठी तिकिट मिळाले.
आजवर ओमानने 98 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी 44 सामने जिंकले असून 51 सामने हरले आहेत. दोन सामने टाय झाले आहेत तर एका सामन्यात कोणताही निकाल लागलेला नाही. ओमानने पहिला टी20 सामना 2015 साली खेळला होता.
आगामी स्पर्धेत ओमानचा समावेश ग्रुप-ए मध्ये करण्यात आला आहे. त्यांच्या मोहिमेची सुरुवात 12 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. 15 सप्टेंबरला त्यांचा सामना यूएईविरुद्ध तर 16 सप्टेंबरला भारताविरुद्ध सामना रंगणार आहे.
ओमानचा एशिया कप 2025 साठीचा संघ
जतिंदर सिंग (कर्णधार), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला (यष्टिरक्षक), सुफियान युसुफ (यष्टिरक्षक), आशीष ओडेडेरा, आमिर कलीम, मोहम्मद नदीम, सुफियान महमूद, आर्यन बिष्ट, करण सोनावळे, जिक्रिया इस्लाम, हसनैन अली शाह, फैसल शाह, मोहम्मद इमरान, नदीम खान, शकील अहमद, समय श्रीवास्तव.
Comments are closed.