क्रीडानगरीतून – ओमानचे नेतृत्व जतिंदरकडे
आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी ओमान क्रिकेट संघाने आपला 15 सदस्यीय अंतिम संघ जाहीर केला आहे. संघाची धुरा अनुभवी फलंदाज जतिंदर सिंगकडे सोपवण्यात आली असून यष्टिरक्षक फलंदाज विनायक शुक्ला उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
ओमानने 43 वर्षीय आमिर कलीमला वगळले आहे. विशेष म्हणजे, ते याच वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या टी-20 आशिया कपमध्ये ओमानच्या प्रमुख कामगिरी करणाऱया खेळाडूंमध्ये होते. आशिया कपच्या तुलनेत ओमानने आपल्या विश्वचषक संघात पाच बदल केले आहेत.
ओमानचा संघ – जतिंदर सिंग (कर्ंधर), विनायक शुक्ला (उक्करंधर), मोहम्मद नदीम, शकील अहमद, हम्माद मिर्झा, वसीम अली, करण सोनावले, फैसल शाह, नदीम खान, सुफियान महमूद, जय ओडेदरा, शफीक जान, आशिष ओडेदरा, जितेन रामानंदी, हसनैन अली शाह.
भारत क्लबचा विजय
मुंबई – छोटय़ा धावसंख्येचा पाठलाग करताना घसरगुंडी उडाल्यावर धनश्री वाघमारे आणि परिणिता पाटीलच्या आश्वासक फलंदाजीमुळे भारत क्रिकेट क्लबने माटुंगा जिमखान्यावर 5 फलंदाज राखून विजय मिळवत मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित सहाव्या अर्जुन मढवी स्मृती टी -20 महिला क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. माटुंगा जिमखान्याने दिलेले 106 धावांचे आव्हान भारत स्पोर्ट्स क्लबने 5 बाद 107 धावा करत पूर्ण केले. माटुंगा जिमखान्याच्या 106 धावांचा पाठलाग करताना परिणीताने 38 धावांची खेळी करत संघाला विजयाची आस दाखवली. पण आघाडीची फळी ढेपाळल्याने भारत क्रिकेट क्लबचा संघ अडचणीत आला. त्यावेळी धनश्रीने नाबाद 19 धावांची खेळी करत इतर फलंदाजांच्या साथीने विजयाचे लक्ष्य गाठले. त्याआधी कस्तुरी गोविलकरच्या नाबाद 43 धावांच्या योगदानामुळे माटुंगा जिमखान्याने शतकी धावसंख्या उभारली. संक्षिप्त धावफलक ः माटुंगा जिमखाना ः 20 षटकांत 6 बाद 106 (कस्तुरी गोविलकर नाबाद 43, अलिना खान 24, निर्मिती राणे 4-16-3, प्रणाली कदम 4-15-1, राजसी नागोसे 4-17-1, परिणीता पाटील 4-21-1) पराभूत विरुद्ध भारत क्रिकेट क्लब ः 16.4 षटकांत 5 बाद 107 (परिणिता पाटील 38, धनश्री वाघमारे नाबाद 19, राजसी नागोसे नाबाद 6, अलिना खान 4-23-2).
आयडियल बुद्धिबळ 4 जानेवारीला
मुंबई – आयडियल स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या वतीने 7 ते 14 वर्षांमधील 6 वयोगटातील शालेय मुला-मुलींची जलद बुद्धिबळ स्पर्धा 4 जानेवारीला परळच्या आरएमएमएस सभागृहामध्ये रंगणार आहे. मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना, आयडियल ग्रुप व आरएमएमएस संयुक्त आयोजित 7 ते 14 वर्षे वयोगटातील एकूण 90 विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कारासह गौरविण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी दिली. दोन वयोगटात विजेत्या ठरणाऱया सबज्युनियर बुद्धिबळपटूस इंडियन ऑईल व आयडियल अॅकॅडमीतर्फे विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सचिव राजाबाबू गजेंगी (93247 19299) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed.