कला केंद्रांतील डीजे कलाकारांच्या मुळावर!
‘राज्यातील कला केंद्रांमध्ये सर्रासपणे डान्स बारचे प्रकार सुरू आहेत. तेथील तबला, ढोलकी आणि पेटी ही लाइव्ह वाद्ये बंद पडली असून, त्या ठिकाणी डीजे वाजवले जात आहेत. या नियमबाह्य प्रकारामुळे अनेक जिल्ह्यांतील कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन तत्काळ कारवाई करावी,’ अशी मागणी ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेचे अध्यक्ष धोंडीराम जावळे, विकास जावळेकर, चंद्रकांत लाखे आदींसह कलाकार उपस्थित होते.
सुरेखा पुणेकर म्हणाल्या, ‘आज राज्यातील बहुतांशी कला केंद्रांमध्ये सर्रास डीजे वापरले जातात. यामुळे पारंपरिक कला लोप पावत चालली आहे. या केंद्राला परवानगी देताना नियम-अटी घालून देण्यात आल्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत कला केंद्रांत सर्रासपणे डान्स बार सुरू आहेत. राज्यात संगीत बारीची ८२ थिएटर आहेत. यांतील 40 ते 50 थिएटरमध्ये डीजे चालू आहेत. यामुळे कला केंद्रांतील कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने याकडे तत्काळ लक्ष घालून कारवाई करावी; अन्यथा आम्ही घुंगरू बांधून मंत्रालयासमोर उपोषण करणार,’ असे पुणेकर यांनी सांगितले.
धोंडीराम जावळे म्हणाले, ‘लोककला जपली पाहिजे, यासाठी शासनाने कला केंद्रे सुरू केली आहेत. पुण्यात पाच कला केंद्रे आहेत. या सर्व ठिकाणी डीजे सुरू आहेत. लातूर, नगर, जामखेड, बीड इथेही अशीच परिस्थिती आहे.
सांस्कृतिकमंत्री एकच होऊन गेले प्रमोद नवलकर
‘राज्यात एकच सांस्कृतिकमंत्री होऊन गेले, ते म्हणजे प्रमोद नवलकर. ते प्रत्यक्षात थिएटरमध्ये जायचे, कलावंतांना भेटायचे, त्यांच्या अडचणी समजून घ्यायचे. थिएटरमध्ये त्यांनी बाथरूम बांधायला सांगितले. आताच्या सांस्कृतिकमंत्र्यांना थिएटरमध्ये जायला काय झालंय? आर. आर. पाटील यांनी केव्हाच डान्स बार बंद केले. मात्र, आता डीजेच्या नावाखाली कलावंतांची उपासमार सुरू आहे. हा प्रकार थांबला नाही तर आम्ही घुंगरू बांधून पेटी, तबला यांसह मंत्रालयावर जाऊन आंदोलन करणार,’ असा इशारा सुरेखा पुणेकर यांनी दिला.
Comments are closed.