तीनही फॉरमॅटसाठी एकच कर्णधार, प्रशिक्षक गंभीरने तयार केला भविष्याचा रोडमॅप! जाणून घ्या नेमका काय आहे प्लॅन

व्हाईट बॉल सामन्यांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर गंभीरच्या रणनीती टीम इंडियाच्या (Team india) बाजूने ठरल्या आहेत. पण कसोटी फॉरमॅटमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा खेळ काहीसा चढ-उताराचा राहिला आहे. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ड्रॉ झाल्यानंतर मात्र गंभीर आत्मविश्वासात दिसले. सांगितले जात आहे की, 2027 वनडे वर्ल्ड कपपर्यंत गंभीर भारतीय संघाचे मुख्य कोच (Gautam Gambhir) राहतील आणि कोच म्हणून पहिल्याच वर्षात त्यांनी काही कठोर निर्णय घेतले आहेत.

सर्वात आधी आशिया कप 2025 (Asia Cup 2025) त्यानंतर लक्ष 2026 च्या टी20 वर्ल्ड कपवर असेल. याच काळात टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या पॉइंट्स टेबलमध्ये चांगली स्थिती कायम राखावी लागेल. त्यानंतर 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठीही गंभीरला कठोर निर्णय घ्यावे लागतील, विशेषत: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबाबत अजूनही स्पष्टता नाही. जाणून घ्या की, प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर भारतीय संघाच्या भविष्यासाठी नेमका कसा रोडमॅप तयार करत आहेत.

याच वर्षी गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी स्पष्ट केलं होतं की, ते तीनही फॉरमॅटमध्ये एका कर्णधारासोबत काम करू इच्छितात, कारण त्यामुळे काम सोपं होतं. पण त्यासोबतच त्यांनी त्यातील कठीणतेकडेही लक्ष वेधलं. भारत वर्षभरात खूप क्रिकेट खेळतो, अशा परिस्थितीत तीनही फॉरमॅट खेळणारा कर्णधार मिळवणं अवघड ठरतं.

सध्या चर्चा आहे की, टीम इंडियाला तीनही फॉरमॅटसाठी एकच कर्णधार दिला जाऊ शकतो. यासाठी शुबमन गिलचं (Shubman gill) नाव पुढे आलं आहे. इंग्लंड दौऱ्यात त्याने पहिली कसोटी मालिका ड्रॉ करून नेतृत्वगुण दाखवले. अनुभव वाढत गेल्याने तो कसोटी कर्णधार म्हणून अधिक परिपक्व होईल.

अलीकडे ही चर्चा होत की, रोहित शर्मा (Rohit Sharma) 2027 वर्ल्ड कपपर्यंत खेळला तरी कर्णधार राहील का याची खात्री नाही. त्यामुळे लवकरच वनडे कर्णधारपदही शुबमन गिलच्या खांद्यावर येऊ शकतं. प्रश्न मात्र टी20 कर्णधारपदावर अडकतो, जो सध्या सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) आहे. गंभीर कोच झाल्यानंतर भारताने प्रत्येक टी20 मालिका जिंकली आहे. पण गंभीरने स्वतः एकच कर्णधार हवा अशी इच्छा व्यक्त केली असल्याने, पुढच्या एका वर्षातच ते टीम इंडियामध्ये मोठा बदल घडवू शकतात.

गेल्या वर्षभरात हेही स्पष्ट झालं आहे की, गंभीर तरुणांवर विश्वास दाखवत आहेत. टी20 संघात अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि अर्शदीप सिंह यांनी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कसोटी संघाचा भार शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांच्यावर तर आहेच, पण आकाशदीप, साई सुदर्शन आणि नितीश कुमार रेड्डी यांसारख्या तरुणांना देखील तयार केलं जात आहे.

वनडे फॉरमॅटमध्ये अजून रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांसारखे अनुभवी खेळाडू आहेत. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर त्यांच्याबाबत मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात, अशा चर्चा सुरू आहे.

Comments are closed.