दरात प्रतिक्विंटल पाचशे रुपयांची घसरण, केंद्राने सडका कांदा आणला बाजारात
किरकोळ बाजारातील वाढत्या दराने सामान्य ग्राहकांत वाढलेला संताप कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नाफेड, एनसीसीएफने साठवलेला सडका कांदा दिल्ली, चेन्नईसह देशाच्या प्रमुख शहरांतील बाजारपेठांमध्ये पाठविला. परिणामी, मागणी घटल्याने पाच दिवसांत नाशिक जिह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा दरात प्रतिक्विंटल पाचशे रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे जिह्यातील शेतकऱयांना सुमारे वीस कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफद्वारे सुमार दर्जाचा परराज्यातील कांदा कमी दरात खरेदी करून साठवून ठेवला. दरात वाढ झाल्याने किरकोळ बाजारात खरेदी करणारा सामान्य ग्राहक नाराज होत आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी लासलगाव, मनमाडहून रेल्वेने नाफेड, एनसीसीएफचा सडका कांदा दिल्ली, चेन्नईसह प्रमुख शहरांत पाठविण्यात आला. परिणामी, मागणी घटल्याने नाशिक जिह्यातील बाजार समित्यांमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याचे भाव घसरत आहेत. जिह्यातील पंधरा बाजार समित्यांमध्ये पाच दिवसांत प्रतिक्विंटल पाचशे रुपयांहून अधिकने दर खाली आले आहेत. जिह्यातील कांदा उत्पादक शेतकऱयांना यामुळे सुमारे वीस कोटी रुपयांचा फटका बसला आहे. उत्पादन खर्च निघण्याइतका समाधानकारक दर मिळत असताना केंद्र सरकारच्या निर्णयाने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. ऐन सणासुदीच्या काळात दर घसरल्याने चिंताग्रस्त शेतकऱयांत संताप व्यक्त होत आहे.
Comments are closed.