‘देवा रे देवा’ काय ही महागाई? मध्यमवर्गीयांच्या नाकाला कांदा लावण्याची वेळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महागाईचा कहर सुरूच असताना साखरेचे भाव 70 रुपयांवर गेल्याने सर्वसामान्यांना दिवसभर लागणारा साधा चहा पिणेही परवडत नाहीय. यातच आता कांद्यानेही रडवायला सुरुवात केली आहे. कांद्याचे भाव एकाच आठवड्यात दुपटीने वाढून 30 रुपयांवरून थेट 60 ते 70 रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या नाकाला ‘कांदा लावण्या’ची वेळ आली असून ‘सांगा, जगायचे तरी कसे’ असा सवाल सामान्यांकडून सरकारला विचारला जात आहे.

गेल्या आठवडय़ात कांदा किरकोळ बाजारात 20 ते 30 रुपये किलो असा मिळत होता. मात्र आता एका किलोला तब्बल 50 रुपये मोजावे लागत आहेत. घाऊक बाजारात कांद्याची आवक वाढल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यातच लसणाचे दरही 120 रुपये किलोंवरून थेट 200 रुपये किलोवर पोहोचेले आहेत. दोन आठवडय़ांपूर्वी हाच दर किलोला 100 ते 120 रुपये होता. मात्र लसणाचीही आवक घटल्याने दर वाढले आहेत. त्यामुळे मध्यवर्गीय ग्राहकांनी कांदा-लसणाच्या खरेदीकडे पाठ फिरवायला सुरुवात केल्याचे व्यापारी सांगत आहेत.

किरकोळ दरात 59 टक्क्यांची वाढ

ग्राहक व्यापार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 24 ऑगस्ट रोजी देशातील कांद्याचा सरासरी किरकोळ दर प्रतिकिलो 43.53 रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वी हाच दर प्रतिकिलो 27.37 रुपये इतका होता. म्हणजेच किरकोळ दरात तब्बल 59 टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान, कांद्याच्या वाढत्या दराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नाशिक येथील बफर स्टॉकमधील कांदा विशेष रेक असलेल्या ‘कांदा एक्स्प्रेस’मधून देशातील प्रमुख शहरांमध्ये पाठवण्यास सुरुवात केली आहे.

सणासुदीत ‘फोडणी’

सध्या सणासुदीचे दिवस असल्याने अनेक पदार्थांची मेजवानी करण्याचे नियोजन मध्यवर्गीय घरात असते. आधीच रोजच्या जेवणात लागणारा नारळ 5 ते 10 रुपयांनी महागल्याने गृहिणी टेन्शनमध्ये असताना आता कांदा-लसूण महागल्याने मध्यमवर्गीयांची ‘फोडणी’ही महागल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

तांदूळ-डाळही भडकली

वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या महिन्याच्या तुलनेत तांदळाच्या दरात तब्बल 11 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे किरकोळ बाजारात साधा कोलम प्रतिकिलो 55 ते 85 रुपये, इंद्रायणी 65 ते 90, आंबेमोहर 100 ते 135 रुपये झाला आहे. यातच किरकोळ बाजारात डाळीच्या किमतींमध्येही 15 ते 19 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने मध्यमवर्गीयांच्या दररोजच्या जेवणात मुख्य असणारा वरण-भात खाणेही मध्यमवर्गीयांसाठी ‘महाग’ झाले आहे.

Comments are closed.