माहुलमधील घरे पालिका कर्मचाऱ्यांना नकोशी!दोन महिन्यांत केवळ 240 कर्मचाऱ्यांचे अर्ज

माहुलमधील घरांच्या विक्रीसाठी मुंबई महापालिकेने वेळोवेळी निकषात बदल करूनही तब्बल दोन महिन्यांनंतरही या घरांसाठी म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. या घरांसाठी आतापर्यंत केवळ 240 कर्मचाऱयांचे अर्ज आले आहेत. उद्या या घरांसाठी दुसऱयांदा वाढवलेली मुदत संपणार आहे. त्यामुळे आता पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार आहे की, पुन्हा निकषांमध्ये बदल केले जाणार आहेत हे उद्याच कळणार आहे.

माहुलमधील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेली घरे मुंबई पालिकेने कर्मचाऱयांसाठी स्वस्तात विक्रीसाठी काढली आहेत. एकूण 13 हजार घरांपैकी 9 हजार 98 घरांसाठी पालिका कर्मचाऱयांकडून 15 मार्चपासून अर्ज मागवण्यात आले होते. मात्र, अर्जाची मुदत वाढवूनही दोन महिन्यांत फक्त 240 कर्मचाऱयांनीच घरासाठी अर्ज केले आहेत.

दोनदा मुदतवाढ

माहुलमधील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेली घरे पालिका कर्मचाऱयांना 12 लाख 60 हजार रुपये किमतीत विकली जाणार आहेत. अर्जाला 15 मार्चपासून सुरुवात झाली तर 15 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत फक्त 231 अर्ज आले. अल्प प्रतिसादामुळे 15 मेपर्यंत मुदत वाढवण्यात आली.

घरे सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचा पर्याय

मुंबई महापालिकेने दोनदा मुदतवाढ देण्याबरोबर अर्ज भरण्याच्या निकषांमध्येही दोन्ही वेळेला बदल करण्यात आले. मात्र, असे करूनही कर्मचाऱयांचा प्रतिसाद मात्र कमी राहिला आहे. सुरुवातीला तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱयांना घरे विकत घेता येतील, अशी अट होती. मात्र, अल्प प्रतिसादामुळे ही अट शिथील करून क्लास वन अधिकारी सोडून इतर सर्व कर्मचारी अधिकाऱयांना घर खरेदीसाठी संधी देण्यात आली. तसेच पालिका वसाहतीतील कर्मचाऱयांनाही अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, आता पुन्हा या निकषांमध्ये बदल करून ही घरे विकली जाण्यासाठी कर्मचाऱयांबरोबर सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचा पर्याय महापालिकेकडे शिल्लक राहिला आहे.

Comments are closed.