सरकारच्या विरोधात निर्णय घेतला तरच…

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी टोचले कान

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी प्रत्येक निर्णय सरकारच्या विरोधात दिला तरच ते स्वतंत्र बुद्धीने न्यायदान करणारे न्यायाधीश आहेत, अशी समजूत काही जणांनी करुन घेतली आहे. तथापि, आम्ही प्रत्येक निर्णय कोणाच्या बाजूने किंवा कोणाच्या विरोधात अशा प्रकारे न देता, प्रकरणाची गुणवत्ता पाहून देत असतो, अशा कानपिचक्या देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिल्या आहेत.

त्यांचा निरोप सभारंभ शनिवारी करण्यात आला. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. कोणत्याही प्रकरणावर निर्णय देताना न्यायाधीशांनी त्या प्रकरणाच्या गुणवत्तेचा विचार करायचा असतो. प्रत्येक निर्णय सरकारच्या विरोधात दिला, तरच न्यायाधीश स्वतंत्र बुद्धीचे किंवा नि:पक्षपाती आहेत अशी समजूत पूर्णत: चुकीची आहे. ज्याची बाजू घटनेच्या, कायद्याच्या आणि परिस्थितीच्या दृष्टीने योग्य आहे, त्याच्या बाजूने कोणत्याही प्रकरणाचा निर्णय देणे, हे न्यायाधीशांचे कर्तव्य आहे. नि:पक्षपातीपणा किंवा परखडपणा सिद्ध करण्यासाठी सरकारच्या विरोधातच निर्णय द्यावा लागतो, असे मुळीच नसते. माझ्या सर्वोच्च न्यायालयातील कार्यकाळात मी अनेक निर्णय दिले. ते सर्व पक्षकार कोण आहे हे न पाहता, प्रकरण अशा प्रकारचे आहे, हे पाहून दिले असून मी या संदर्भात समाधानी आहे. आमच्या समोर येणाऱ्या प्रत्येक प्रकरणाकडे आम्ही समान दृष्टीकोनातूनच पाहतो, असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले.

नव्हता कोणताही दबाव

माझ्या सर्वोच्च न्यायालयातील कालखंडात माझ्यावर कोणीही, कोणताही राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही, असे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. आमचे सर्व कामकाज दबावमुक्त वातावरणात झाले. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. प्रत्येक प्रकरणाचा निर्णय आम्ही त्या त्या प्रकरणामध्ये अंतर्भूत असलेल्या बाबींना अनुसरुनच दिला आहे. दबावाखाली नव्हे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

न्या. विपुल पांचोली प्रकरण

न्या विपुल पांचोली यांच्या पदोन्नतीसंबंधात न्यायवृंदामध्ये मतभेद निर्माण झाले होते. न्या. नागरत्ना यांनी त्यांच्या पदोन्नतीला विरोध केला होता. ही बाब सत्य असली, तरी अशा प्रकारचे मतभेद होणे ही जगावेगळी बाब नाही. तसे मतभेत होत असतात. मात्र. न्या. नागरत्ना यांचा आक्षेप योग्य असता, तर न्यायवृंदातील इतर चार न्यायाधीशही त्यांच्याशी सहमत झाले असते. न्या. नागरत्ना यांच्या विरोधाला प्रसिद्धी देण्यात आली नाही. कारण त्यांनी स्वत:च त्याला प्रसिद्धी देऊ नये, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे या प्रकरणाला अधिक महत्व देणे अयोग्य आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी या प्रसंगासंबंधी भाषणात माहिती दिली. माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे 23 नोव्हेंबरला, अर्थात रविवारी निवृत्त झाले.

Comments are closed.