मुंबईतील पहिले मँग्रोव्ह उद्यान नागरिकांसाठी खुले करा, आदित्य ठाकरे यांची सरकारकडे मागणी

गोराई येथील मुंबईतील पहिल्या मँग्रोव्ह उद्यानाचे काम पूर्ण होऊनही ते अद्याप जनतेसाठी खुले का करण्यात आले नाही? असा सवाल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहिले आहे. हे उद्यान तातडीने खुले करून नागरिकांना निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

वनमंत्री गणेश नाईक यांना लिहिलं पात्र आदित्य ठाकरे यांनी X वर शेअर केले आहे. या पत्रात आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी पर्यावरण मंत्री असताना पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून मुंबईतील पहिले मँग्रोव्ह उद्यान गोराई येथे उभारण्याचा निर्णय माझ्या पुढाकाराने घेण्यात आला होता. या प्रकल्पाची सुरुवात विशेष DPDC निधीच्या माध्यमातून करण्यात आली होती.”

ते म्हणाले आहेत की, “या उद्यानात निसर्गविषयक माहिती केंद्र, मँग्रोव्ह वॉक ट्रेल, पक्षी निरीक्षण केंद्र अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. येथे पक्ष्यांच्या विविध प्रजाती पाहायला मिळणार असून, विशिष्ट ऋतूंमध्ये स्थलांतरित पक्षीदेखील या भागात येतात. या प्रकल्पामागील प्रमुख उद्दिष्ट म्हणजे नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे, इको-टुरिझमला चालना देणे तसेच मुंबईतील हिरवळ वाढवणे हे आहे. महाराष्ट्र वन विभागाच्या खारफुटी कक्षाने २०२१ मध्ये सुरू केलेल्या या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी २०२५ मध्ये अनेक वेळा तारखा जाहीर करण्यात आल्या. सुरुवातीला १ मे २०२५ रोजी हे उद्यान खुले होणे अपेक्षित होते. त्यानंतर तारीख दि. ५ जून २०२५ (जागतिक पर्यावरण दिन) पर्यंत पुढे ढकलण्यात आली. पुढे जुलै व ऑगस्ट २०२५ या कालावधीत सुधारित वेळापत्रके देण्यात आली. सध्या हे उद्यान पूर्णतः तयार असूनही ते अद्याप नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही.”

पत्रात आदित्य ठाकरे की, हे उद्यान तातडीने नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल. तसेच महाराष्ट्रातील इतरही ज्या ठिकाणी मँग्रोव्ह उद्यान उभारणे शक्य आहे, त्या प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे मँग्रोव्ह उद्यान उभारण्यात यावे, जेणेकरून पर्यावरण संवर्धन व पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होईल आणि इको-टुरिझमला चालना मिळण्यास मदत होईल.”

Comments are closed.