'ऑपरेशन सिंडूर' ए 'गेम चेंजर'
दहशतवादाविरुद्ध नवी आघाडी म्हणून मिळाली ओळख, भारताच्या सैन्यदलांचेही वाढले महत्व
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या क्रूर इस्लामी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने दहशतवादाविरोधात एक नवी आणि निर्णायक आघाडी उघडली आहे, अशी भावना जगभरात निर्माण झाली आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला हे भारताचे प्रखर पण संयमी आणि मर्यादित असे प्रत्युत्तर आहे, हे जगाला पटवून देण्यात भारत यशस्वी होत आहे.
भारताने दहशतवादाला दिलेल्या या प्रत्युत्तराला जगभरातून पाठिंबा मिळताना दिसून येतो. भारत आता दहशतवादी हल्ले सहन करणार नाही. त्यांचा केवळ कागदी निषेध करणार नाही. तर आपले सैनिकी बळ उपयोगात आणून तो दहशतवादाला सशस्त्र प्रत्युत्तर देईल आणि स्वबळावर दहशतवाद मोडून काढण्याचा यशस्वी प्रयत्न करेल. जे देश दहशतवादाचे समर्थन करतात किंवा त्याला प्रोत्साहन देतात, त्या देशांनाही धडा शिकविण्यास भारत मागेपुढे पाहणार नाही, असा एक नवा संदेश भारताच्या या अभियानामुळे विश्व समुदायाला मिळाला आहे.
अनपेक्षित पुश
भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणणे हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांचे नेहमीचे धोरण आहे. तथापि, आत्तापर्यंत कधी जम्मू-काश्मीरमधील पर्यटकांवर हल्ला झाला नव्हता. पहलगाम हल्ला मात्र, अशा प्रकारचा गेल्या कित्येक दशकांमधील प्रथम हल्ला होता. या हल्ल्याचा पाया उघडपणे ‘धर्म’ हा होता. कारण पर्यटकांची हत्या त्यांचा ‘धर्म’ विचारुन करण्यात आली होती. या हल्ल्याविरोधात साऱ्या भारतात संतापाची प्रचंड लाट निर्माण होण्याचे हे एक महत्वाचे कारण होते. तथापि, भारत या हल्ल्याचा अशा प्रकारे तीव्र प्रत्युत्तर देईल, अशी कोणाचीच अपेक्षा नव्हती. पाकिस्तानसह इतर देशही भारताच्या अशा कृतीची अपेक्षा करीत नव्हते. पण, भारताने आपल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या वायुदलाचे कंबरडे मोडले. भारताचे हे प्रत्युत्तर इतके निर्णायक होते, की पाकिस्तानचे नेते शहाबाझ शरीफ यांना भारताने पाकिस्तानच्या वायुदलाची मोठी हानी केली आहे, याची जाहीररित्या कबुली द्यावी लागली आहे. भारताने आता कात टाकल्याचाच हा पुरावा होता. भारत आता पूर्वीचा राहिलेला नाही. तो आपल्यावरील हल्ला सहन करणार नाही, हे यानिमित्ताने जगाला कळून चुकले.
समर्थन, मौन आणि टीका
भारताच्या या झणझणीत आणि झोंबऱ्या प्रत्युत्तराला जगातील महासत्तांनी उघड समर्थन दिले नसले तरी, उघड विरोधही केलेला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारताच्या प्रतिहल्ल्यानंतर झालेल्या शस्त्रसंधीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न प्रथम केला. अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे संभाव्य अणुयुद्ध थांबले, अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रथम व्यक्त केली होती. तथापि, नंतर त्यांनी अमेरिकेने मध्यस्थी केली नसल्याचे स्पष्ट केले आणि केवळ शांततानिर्मितीत साहाय्याचे प्रतिपादन केले. इस्लामी देशांनीही भारताच्या प्रत्युत्तरावर मौन पाळले आहे. केवळ पाकिस्तानने अर्थातच त्याला मिळालेल्या झटक्यामुळे भारतावर टीका केली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताचा हा अधिकार असल्याचे स्पष्ट केले.
एकंदर जगभरातील राजकीय नेते, मान्यताप्राप्त वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमे यांनी ज्याप्रकारे भारताच्या प्रत्युत्तराला प्रसिद्धी दिली आणि मतप्रदर्शन केले, त्यावरुन असा निष्कर्ष काढता येतो, की स्वत:च्या सन्मानासाठी कठोर पावले उचलण्याची क्षमता असणारा देश अशी भारताची प्रतिमा या 4 दिवसांच्या संघर्षामुळे निर्माण झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत चार युद्धे झाली आहेत. तथापि, युद्ध मानले न गेलेल्या या सशस्त्र संघर्षामुळे भारताचा धाक जगात निर्माण झाला आहे, जो आतापर्यंतच्या भारत-पाकिस्तान युद्धानंतरही निर्माण झाला नव्हता. भारताच्या प्रभावी आणि यशस्वी प्रत्युत्तराने भारतासाठी अनेक प्रकारची सकारात्मक कामगिरी केली असून ती भविष्यकाळात भारताच्या हिताची ठरणार आहे. भारताला या संघर्षामुळे नवी ओळख मिळाली असून भारताची पूर्वी असणारी एक ‘सॉफ्ट नेशन’ किंवा सौम्य राष्ट्र ही प्रतिमा आता पूर्णपणे परिवर्तित झाली आहे. चार युद्धानंतरही भारताची प्रतिमा सौम्य राष्ट्र अशीच प्रामुख्याने होती. ती या संघर्षामुळे अमूलाग्र बदलली, हे निश्चित आहे.
प्रतिमापरिवर्तनासाठी अभियान उपयुक्त
ड सिंदूर अभियानामुळे भारताची सॉफ्ट स्टेट ही प्रतिमा झाली इतिहासजमा
ड भारताच्या आक्रमक प्रत्युत्तरामुळे सैन्यदलांसंबंधी निर्माण झाला एक दरारा
ड या नव्या प्रतिमेचा भारताला भविष्यात लाभ होईल, असा तज्ञांचा विचार
ड भारताच्या सैन्यदलांप्रमाणेच युद्ध तंत्रज्ञानातही भारत वरचढ असल्याचे सिद्ध
Comments are closed.