मतचोरीनंतर बिनविरोध नगराध्यक्ष निवडीचा नवा फंडा… कुछ तो गडबड है! मतदानाआधीच भाजपविषयी संशयकल्लोळ

मतचोरी करून भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जिंकल्याचा आरोप झाला. त्यानंतर आता नगरपरिषद आणि नगरपंचायत मतदानाआधीच भाजपविषयी संशयकल्लोळ सुरू झाला आहे. चिखलदरा येथे मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ नगरसेवकपदी तर जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजनांची पत्नी, दोंडाईचा नगरपालिकेत मंत्री जयकुमार रावलांच्या मातोश्री नगराध्यक्षपदी बिनविरोध विजयी झाल्या. त्यावरून ‘हा काय नवा फंडा… कुछ तो गडबड है’, अशी शंका विरोधकांनी घेतली असून साम-दाम-दंड-भेद याच्या जोरावर सत्ताधाऱयांनी नातेवाईकांना बिनविरोध निवडून आणल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका जिंकण्यासाठी मंत्री आणि आमदारांना उतरवले आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांचे भाजपमध्ये प्रवेश घडवून आणले. हे कमी म्हणून की काय, कुठे विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद करून, तर कुठे दबाव टाकून उमेदवारी माघारी घेण्यासाठी भाग पाडत राज्यात बहुतांश ठिकाणी भाजपने बिनविरोध जागा निवडून आणल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी नगराध्यक्ष

जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी पत्नी साधना महाजन यांना नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आणत विरोधकांबरोबर मित्रपक्षालाही धक्का दिला आहे. याशिवाय भाजपचे 10 नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत.

पेण नगरपरिषदेत महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध

रायगडच्या पेण नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे 3 उमेदवार तर अजित पवार 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विजयी उमेदवारांमध्ये भाजपच्या मालती म्हात्रे, स्मिता पेणकर, अभिराज कडू तर अजित पवार गटाच्या सुशीला ठाकूर, वसुधा पाटील यांचा समावेश असून राष्ट्रवादीचे दीपक गुरव यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने भाजपचे कडू आणि अजित पवार गटाच्या सुशीला ठाकूर विजयी झाल्या.

भाजपच्या माघारीमुळे शिर्डी नगरपरिषदेत अपक्ष बिनविरोध

शिर्डी नगरपरिषदेत अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. प्रभाग क्रमांक 8 मधील भाजपच्या उमेदवार मनीषा गोंदकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. अपक्ष उमेदवार छाया शिंदे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शिष्टाईने भाजपच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतल्याने छाया शिंदे विजयी झाल्या.

परळीत महायुतीचे दोन उमेदवार विजयी

परळी नगरपरिषदेत शिंदे गटाचा एक उमेदवार आणि अजित पवार गटाचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे. अजित पवार गटाच्या रेश्मा बळवंत तर शिंदे गटाच्या जयश्री गीते बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

तळेगाव-दाभाडे येथे भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध

तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेमध्ये भाजपचे तीन आणि अजित पवार गटाचा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आला आहे. लोणावळा नगरपरिषदेमध्येही भाजपचा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आला आहे.

कराडच्या मलकापूरमध्ये भाजपचे पाच उमेदवार विजयी

कराडच्या मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले असून स्थानिक राजकारणात याची मोठी चर्चा रंगली आहे. नगरसेवकपदाच्या 22 जागांसाठी 134 इच्छुकांचे अर्ज दाखल असून भाजपचे प्रभाग क्रमांक सात आणि नऊमधील सर्व चारही उमेदवार आणि प्रभाग चारमधील एक असे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

मंगळवेढय़ात भाजप आमदाराचा भाऊ बिनविरोध

मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत भाजप आमदार समाधान अवताडे यांचा भाऊ सोमनाथ अवताडे यांची प्रभाग 3 मधून बिनविरोध निवड झाली.

दोंडाईचा नगरपालिकेत नगराध्यक्षसह भाजपचे 26 नगरसेवक बिनविरोध

धुळय़ातील दोंडाईचा नगरपालिकेत मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्या. अर्ज माघारीच्या दिवशी भाजपविरोधातल्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने नगराध्यक्षसह भाजपच्या 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली.

अमरावतीत फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध

अमरावती जिह्यातील चिखलदरा नगरपरिषदेत नगरसेवक पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांची बिनविरोध निवड झाली आहे. कलोती निवडणूक रिंगणात असलेल्या प्रभागातून काँग्रेसच्या उमेदवारासह नऊ उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत पहिला धमाका

अजित पवार गटातून भाजपमध्ये दाखल झालेल्या माजी आमदार राजन पाटील यांनी सोलापूर जिह्यातील अनगर नगरपंचायतीत सर्वच्या सर्व 17 जागा बिनविरोध निवडून आणत पहिला धमाका केला. नगराध्यक्षपदाच्या अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज भरू नये यासाठी त्यांची नाकाबंदी केली. त्यानंतरही त्यांनी पहाटे पाचच्या सुमारास नगरपंचायत गाठून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद ठरविण्यात आल्याने राजन पाटील यांच्या सूनबाई प्राजक्ता पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

भाजप 'पुरम वेल्ट स्टेशन्स' – रोहित पवार

बिनविरोध निवडणुका होत आहेत ही चांगली गोष्ट आहे, परंतु भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होत आहेत? हा प्रश्न आहे. साम-दाम-दंड-भेद वापरून लोकशाहीचा गळा घोटला जात नसेल ही अपेक्षा! घराणेशाहीवरून आरोप करणाऱ्या भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘कुटुंब कल्याण योजना’ राबवत पक्षाच्या ‘तळागाळातल्या कार्यकर्त्यांना’ ‘न्याय’ देऊन पक्षांतर्गत ‘लोकशाही’ ‘मजबूत’ करत आपला पक्ष कसा ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहे हे दाखवून दिले. वर्षानुवर्षे भाजपसाठी काम करणाऱया केशव उपाध्ये, माधव भांडारी यांच्यासारख्या निष्ठावंतांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.

राजगुरूनगरात नगरसेवकपदासाठी लागली एक कोटीची बोली!

पुण्याच्या राजगुरूनगर नगरपरिषदेत निवडणुकीचा लिलाव झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्वसाधारण जागेवर नगरसेवकपदासाठी 1 कोटी 3 लाख, तर महिला राखीव जागेसाठी 22 लाख रुपयांची बोली लावली गेली. निवडणूक बिनविरोध व्हावी व विकासासाठी निधी उभा रहावा असे कारण देत गावकऱयांनी हा मार्ग अवलंबला.

Comments are closed.