अधिवेशन वांझोटे…निवडणुकीचा जुमला! विरोधकांचा हल्ला
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन पूर्णपणे वांझोटे ठरले, हे अधिवेशन म्हणजे केवळ ‘निवडणुकीचा जुमला’ असून सरकारने शेतकरी आणि विदर्भातील जनतेच्या तोंडाला पाने पुसली. शेतकरी कर्जमाफीचा पत्ताच नाही, असा जोरदार हल्ला विरोधी पक्षाने केला.
हिवाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. त्यानंतर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन सरकारचे वाभाडे काढले. शिवसेना नेते-आमदार भास्कर जाधव, कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते-आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष-आमदार शशिकांत शिंदे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. विरोधकांनी या वेळी महायुती सरकारवर सडकून टीका केली. विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
‘लाडकी बहीण’ आणि युवकांचा भ्रमनिरास
लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा सरकारने केली होती. परंतु त्याचे नावसुद्धा घेतले नाही. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या मुद्दय़ाबाबतही ठोस काहीच न करता युवकांचा भ्रमनिरास केला. अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर सरकारने एक शब्दही काढला नाही. वैदर्भीय जनतेची तर सरकारने अक्षरशः फसवणूक केली, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
15 ते 20 निवेदने माझ्या हातात आहेत; पण त्यातील एकही निवेदन विदर्भाशी संबंधित नाही. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण महापालिकांमधील निर्णय आहेत, याचा अर्थ मुंबई निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने ते निर्णय घेतले आहेत, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला. मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे अर्थसंकल्पातील भाषणाची कॉपी पेस्ट होती.
धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी 20 हजार रुपये बोनस, संत्रा-मोसंबी उत्पादक आणि सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल अनुदानाची मागणी विरोधी पक्षाने केली होती; पण त्यावर सरकारने काहीच केले नाही. संत्रा-मोसंबीला मार्केट नाही, बांगलादेशच्या निर्यात शुल्कावरही सरकार गप्प आहे. सिंचनासंदर्भातील प्रश्नही सुटले नाहीत. 46 हजार बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला, पण त्यावरही ठोस उपाययोजना नाही. गुन्हेगारीचा आलेख वाढल्याचे मान्य करूनही सरकार केवळ जुजबी उत्तरे देत आहे. त्यामुळे हे अधिवेशन पूर्णपणे निष्फळ ठरले आहे,’’ अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
पार्थ पवारबाबत सरकारलाच विचारावे
पार्थ पवार प्रकरणाबाबत या वेळी प्रसारमाध्यमांनी विचारले असता वडेट्टीवार म्हणाले की, भ्रष्टाचाराचे प्रकरण विरोधी पक्षाने लावून धरले आहे. परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांनी काहीही उत्तर दिले नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पार्थ पवारला क्लीन चिट दिली. पार्थ पवार प्रकरणात ज्यांनी खाल्ले त्यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले पाहिजेत, विरोधकांऐवजी प्रसारमाध्यमांनी सरकारला, मुख्यमंत्र्यांना, अजित पवार यांना विचारायला हवे, असे वडेट्टीवार म्हणाले.
सभागृहाऐवजी बाहेरच्या मुद्दय़ावरच भाषण – सचिन अहिर
विधान परिषदेत एकनाथ शिंदे यांनी केलेले भाषण हे राजकीय भाषण होते. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. सभागृहात विचारलेल्या प्रश्नांऐवजी सभागृहाबाहेरच्या मुद्दय़ांवर भाषण केले, अशी टीका शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी केली. शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुका समोर ठेवून नुसत्या घोषणा केल्या, असे ते म्हणाले. चेहरा तर बदलता येत नाही, फक्त इकडचा भांग तिकडे करायचा अशी कोटीही त्यांनी केली.
घोषणांचा पाऊस पडला – सतेज पाटील
अधिवेशनाच्या सात दिवसांत फक्त घोषणांचा पाऊस पडला असे या वेळी सतेज पाटील म्हणाले. इन्ट्राग्रामचा व्हिडियो 12 सेकंदांचा असतो तशा घोषणा सरकारने केल्या. दुसऱ्या तिसऱ्या घोषणेवर जायचे तेव्हा पहिली काय होती हेच सरकार विसरले, फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स असे हे अधिवेशन होते, असे ते पुढे म्हणाले.
जणू देशाचे बजेट, पण पदरात काहीच नाही
विजय वडेट्टीवार यांनी या अधिवेशनाचा उल्लेख ‘वांझोटे अधिवेशन’ असा करतानाच हा निवडणुकीचा जुमला होता, अशी तोफ डागली. ‘‘मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील आकडेवारी पाहिली तर ते देशाचे बजेट वाटत होते, पण प्रत्यक्षात पदरात काहीच पडले नाही,’’ असे ते म्हणाले.
एक दिवसही विदर्भावर चर्चा नाही!
सात दिवस अधिवेशन चालले; पण एक दिवस तरी विदर्भावर चर्चा करावी असे सरकारला वाटले नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. एमआयडीसीने किती करार केले त्याची माहिती आम्ही मागितली होती; परंतु कराराच्या वेळी ठरलेले आकडे सरकारने दिले. जेवढी गुंतवणूक होते तेवढे उद्योग निर्माण होत नसल्याने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत, असे जयंत पाटील म्हणाले. गावखेडय़ांमध्ये ड्रग्जचा विळखा पडला आहे, पुणे हे गुन्हेगारीचे माहेरघर बनले आहे, त्यावर सरकारने ठोस उत्तर दिले नाही. लाडक्या बहिणींचे 1500 चे 2100 रुपये कधी करणार? शेतकरी कर्जमाफी कधी करणार? याची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
Comments are closed.