विरोधी पक्ष आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणार आहेत.

राहुल गांधी यांची माहिती : मतचोरी, एसआयआर थांबवण्याची मागणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

एसआयआर वादावर आवाज उठवण्यासाठी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष सोमवार, 12 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाला धडक देतील, अशी माहिती लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी दिली. यावेळी त्यांनी दिल्लीतील तरुणांची आंदोलने दडपल्याचा आरोप पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांवर केला.

विरोधी पक्ष सोमवारी  तरुण आणि नागरी समाज संघटनांसोबत सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढतील, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी सांगितले. हा मोर्चा पक्ष, लिंग, जात, समुदाय आणि राज्याच्या सीमा ओलांडून भारतीय नागरिक म्हणून काढला जाईल, असे ते म्हणाले. आजच्या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. मतचोरी थांबवावी, एसआयआरवर बंदी घालावी आणि ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा अशा आपल्या मागण्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी अनेक आरोपही केले आहेत. देशातील तरुण दिल्लीत शनिवारी शांततापूर्ण आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या मनात प्रेम होते, द्वेष किंवा राग नव्हता. पण पोलीस आणि भाजपच्या गुंडांनी त्यांना मारहाण केली. आम्हाला असा भारत नको आहे. सोमवारी, 12 ऑक्टोबर रोजी, आम्ही भारतीय म्हणून सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढू. पक्ष, लिंग, जात, समुदाय आणि राज्याचे सर्व अडथळे ओलांडून, आम्ही सर्वजण एकत्र चालू, असे ट्विट त्यांनी केले आहे. देशातील तरुण, सर्व विरोधी पक्ष, नागरी समाज आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणारे व भारताच्या संविधानाच्या पाठीशी उभे राहणारे सर्वजण आमच्यासोबत चालतील. आम्ही देशाच्यावतीने सरन्यायाधीशांना एक निवेदन सादर करू, असे ते पुढे म्हणाले.

सरन्यायाधीशांची भेट घेणार : खर्गे

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सोमवारी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दोन्ही नेते कथित मतचोरीच्या मुद्यावर न्यायपालिकेच्या हस्तक्षेपाची विनंती करणार आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी बेंगळूर येथे ही घोषणा केली.  सोमवारी सायंकाळी 4 ते 5 या वेळेत सरन्यायाधीशांना भेटण्याची वेळ मागितली आहे. आम्ही सरन्यायाधीशांसमोर मागण्या न करता त्यांना परिस्थितीची माहिती देऊ. आम्ही फक्त हात जोडून विनंती करू शकतो, असेही खर्गे पुढे म्हणाले.

Comments are closed.