त्रिगुणी लसीचा फॉर्म्युला खासगी कंपनीला विकण्यास विरोध, सर्वपक्षीय सदस्य खासगीकरणाच्या विरोधात एकवटले
राज्य सरकारच्या मालकीच्या हाफकीन महामंडळाच्या त्रिगुणी लसीचा फॉर्म्युला खासगी कंपनीला विकण्यास विधिमंडळाच्या लोकलेखा समितीमधील सर्वपक्षीय सदस्यांनी कडाडून विरोध केला आहे. सरकारकडे निधीची मागणी करण्याऐवजी थेट खासगी कंपनीला फॉर्म्युला विकण्याच्या निर्णयावरून संतप्त झालेल्या लोकलेखा समितीच्या सदस्यांनी हाफकीनचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर यांना लस टोचल्याची चर्चा आहे.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हाफकीन बायो फार्मास्युटिकलच्या खासगीकरणाचा विषय सदस्यांनी मांडला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी विधिमंडळाच्या लोकलेखा समितीसमोर हाफकीन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर यांना बोलवण्यात आले होते. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार हे लोकलेखा समितीचे अध्यक्ष आहेत तर सर्व पक्षांचे मिळून 26 सदस्य आहेत.
या समितीने सुनील महिंद्रकर यांना फैलावर घेतल्याची विधिमंडळात चर्चा आहे. त्रिगुणी लसीचा फॉर्म्युला खासगी कंपनीला देण्याचा निर्णय हाफकीनच्या संचालक मंडळाने कशासाठी घेतला आणि संचालक मंडळाला असा अधिकार आहे का, असा प्रश्न सदस्यांनी केला. त्यावर संचालक मंडळाला असा अधिकार असल्याचा दावा सुनील महिंद्रकर यांनी केला आणि संचालक मंडळाचा निर्णय राज्य सरकारला कळवला आहे. त्यावर आता राज्य सरकार अंतिम निर्णय घेईल, असे उत्तर या वेळी महिंद्रकर यांनी दिल्याचे सांगण्यात येते. त्रिगुणी लसीच्या प्लँटच्या आधुनिकीकरणासाठी पाचशे कोटी रुपयांची आवश्यकता होती असे उत्तर सुनील महिंद्रकर यांनी दिले. त्यावर तुम्ही राज्य सरकारकडे निधीची मागणी का केली नाही, असा प्रतिप्रश्न सदस्यांनी केला.
जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले असून त्रिगुणी लसीचा फॉर्म्युला खासगी कंपनीला देण्याचे प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी केली आहे. बड्या खासगी कंपनीने हा फॉर्म्युला व्यावसायिक अटींवर विकत घेण्याचा प्रस्ताव दिल्यावर शासन पातळीवर लगेचच विक्री प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसते. हा विषय मी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मांडला होता. मात्र त्यावर शासनाकडून यावर कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही. फॉर्म्युला खासगी कंपनीला देण्याऐवजी हाफकीन महामंडळाने स्वतः लसींचे उत्पादन करावे. त्यामुळे नागरिकांना स्वस्त दरात लस उपलब्ध होईल असे जयंत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.
Comments are closed.