माधवी बुच यांच्याविरूद्ध खटला नोंदविण्याचा आदेश
सेबीच्या माजी प्रमुख शेअर फसवणूकप्रकरणी अडचणीत: भ्रष्टाचाराचाही आरोप
वृत्तसंस्था/ मुंबई
मुंबईतील विशेष भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने सेबीच्या माजी प्रमुख माधवी पुरी बुच यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. माधवी बुच यांच्याव्यतिरिक्त न्यायालयाने शेअर बाजारातील फसवणूक आणि नियामक उल्लंघनाच्या प्रकरणात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) उच्च अधिकाऱ्यांविरुद्धही खटला दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) 30 दिवसांच्या आत स्थिती अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
ठाण्यातील पत्रकार सपन श्रीवास्तव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर विशेष न्यायाधीश एस. ई. बांगर यांनी हा आदेश दिला आहे. सपन श्रीवास्तव यांनी एका कंपनीच्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये नोंदणीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रभाकर तरंगे आणि राजलक्ष्मी भंडारी यांनी बाजू मांडली.
माधवी बुच यांच्यासह सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये अश्वनी भाटिया, अनंत नारायण, कमलेश चंद्र, प्रमोद अग्रवाल, सुंदररामन रामामूर्ती आदींचाही समावेश आहे. सेबीचे अधिकारी त्यांच्या वैधानिक कर्तव्यात अपयशी ठरल्याचे तक्रारदाराने याचिकेत म्हटले आहे. तसेच या प्रकरणात गुंतवणूकदारांचे नुकसान झाल्याचा दावाही करण्यात आला आहे.
Comments are closed.