सार्वजनिक बांधकाम खात्यात बेमोसमी ‘होलसेल’ बदल्या; चार महिन्यांनंतर अखेर आदेश निघाले, एका फटक्यात136 उपअभियंत्यांना हलवले
सार्वजनिक बांधकाम खात्यातील बदल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याच्या तक्रारींमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेली चार महिने रोखून धरलेल्या उपविभागीय अभियंत्याच्या बदल्यांचे आदेश आज अखेर जारी करण्यात आले. तब्बल 136 उपअभियंत्यांच्या बेमोसमी बदल्या करताना विभागाने बदलीसाठी पात्र असलेल्या मुंबईतील काही उपअभियंत्यांना हात न लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
बदली पात्र सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या सर्वसाधारणपणे मार्च ते जून महिन्यात केल्या जातात. सार्वजनिक बांधकाम विभागाने एप्रिल- मे महिन्यात काही अभियंत्यांच्या बदल्या केल्या होत्या, तर जवळपास 170 हून अधिक अभियंते बदलीच्या प्रतीक्षेत होते. या अभियंत्यांना जून-जुलै महिन्यात बदली अपेक्षित होती. मात्र तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केलेल्या अभियंत्यांच्या बदल्या अपेक्षित असताना त्यांना आहे त्याच ठिकाणी मुदतवाढ प्रस्तावित करण्यात आली होती, तर काही अभियंत्यांना पुन्हा मोक्याच्या जागी बदल्या प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. या प्रस्तावित बदल्यांमध्ये संशय असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी बदल्यांची फाईल मंजूर न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने आज 136 बदल्यांचे आदेश काढले.
n 10 उपअभियंत्यांना कार्यकारी अभियंता म्हणून बढती देऊन पदस्थापना देण्यात आली आहे.
n 15 उपअभियंत्यांना सुधारित पदस्थापना मिळाली आहे.
n स्थापत्य शाखेच्या 110 आणि विद्युत शाखेच्या एका उपअभियंत्यांनाही इतरत्र हलवण्यात आले आहे.
n मुंबईतील सतीश आंबवडे, राजेंद्र सोनार, माधव पंदीलवाड यांच्या मुंबईतच बदल्या झाल्या आहेत. या सर्व बदल्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.
या अभियंत्यांचे काय?
तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केलेले उपविभागीय अभियंता अशोक गायकवाड, अनिल पनाड, संजय घरत, अजय बापट आदींच्या बदल्यांचे आदेश रखडले आहेत.
Comments are closed.