गुरुवायूर मंदिरात ‘उदयस्थमन पूजा’ वेळेवर करण्याचे आदेश

परंपरेत बदल करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

केरळच्या प्रसिद्ध गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिरात ‘एकादशी’निमित्त केली जाणारी ‘उदयस्थमन पूजा’ 1 डिसेंबर रोजी परंपरेनुसार होईल, असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. उदयस्थमन पूजेमध्ये कोणताही बदल किंवा हस्तक्षेप करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्या. जे. के. माहेश्वरी आणि विजय बिश्नोई यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. ‘उदयस्थमन पूजा’ ही एक विशेष धार्मिक विधी असून ती सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालू राहते. याप्रसंगी सलग 18 पूजा, होम, अभिषेक आणि इतर विधी केले जातात.

‘उदयस्थमन पूजा’ 1972 पासून पारंपरिकपणे केली जात असून त्यात कोणताही बदल अस्वीकार्य आहे. गुरुवायूर मंदिराची पूजा पद्धत वेदांत तत्वज्ञानी आदि शंकराचार्य यांनी विहित केली असल्याने त्यात आता ऐनवेळी फेरबदल करणे क्रमप्राप्त नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणी खंडपीठाने सर्व पक्षांना त्यांचे युक्तिवाद पूर्ण करण्याचे निर्देश देताना आता या प्रकरणाची पुढील सुनावणी मार्च 2026 मध्ये निश्चित केली आहे. पी. सी. हॅरी आणि पुरोहित अधिकार धारण करणाऱ्या इतर कुटुंबातील सदस्यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हा मुद्दा उपस्थित झाला.

देवस्वोम प्रशासनावर नाराजी

गेल्यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिराच्या देवस्वोम प्रशासनावर कडक टीका केली. गर्दी व्यवस्थापनाचे कारण देत प्रशासनाने ही पूजा न करण्याचा निर्णय घेतला होता. शतकानुशतके जुनी परंपरा मोडणे अयोग्य असल्याचे सांगून न्यायालयाने यावर तीव्र आक्षेप घेतला. न्यायालयाने मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनाही याबाबत विचारणा केली होती.

परंपरा आणि धार्मिक महत्त्व

‘उदयस्थमन पूजा’ या शब्दाचा अर्थ सूर्योदय (उदय) पासून सूर्यास्तापर्यंत (अष्टमन) सतत पूजा करणे असा होतो. या दिवशी भगवान श्रीकृष्णासाठी दिवसभर विशेष भक्ती अर्पण आणि यज्ञ-पूजा आयोजित केल्या जातात. ही परंपरा भाविकांच्या श्रद्धेत खोलवर रुजलेली असून ती सर्वात पवित्र प्रसंगांपैकी एक मानली जाते. गुरुवायूर एकादशीवरील या पूजेला प्रचंड धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.

Comments are closed.