ओसामाचे नाव, त्याचे काम
सिवानमध्ये योगी आदित्यनाथांचा शाब्दिक घणाघात : बाहुबली शहाबुद्दीनचा पुत्र लक्ष्य
वृत्तसंस्था/ रघुनाथपूर
छट पूजेनंतर बिहार निवडणुकीतील राजकीय रंगत वाढली आहे. बिहारच्या निवडणुकीच्या मैदानात आता दिग्गज नेते उतरले असून जाहीरसभांना संबोधित करत आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी सिवानच्या रघुनाथपूर येथे प्रचारसभेला संबोधित केले आहे. यादरम्यान यांगींनी पुन्हा एकदा राजदला जंगलराजवरून लक्ष्य केले आहे. योगींनी स्वतच्या सभेत बाहुबली नेता शहाबुद्दीनचा पुत्र ओसामावर जोरदार निशाणा साधला. ओसामाच या मतदारसंघातून राजदचा उमेदवार आहे. रघुनाथपूरमध्ये राजदने उभा केलेला उमेदवार स्वत:च्या कौटुंबिक गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे केवळ या क्षेत्रात नव्हे तर देशविदेशात कुख्यात राहिला आहे. त्याचे नावच पहा, जसे नाव तसे काम असे म्हणत योगींनी ओसामाला लक्ष्य केले आहे.
बिहारची भूमी आम्हा सर्वांसाठी ज्ञान, क्रांती आणि शांतीची भूमी आहे. या भूमीने नालंदा विद्यापीठ दिले, या भूमीनेच चाणक्य, डॉ. राजेंद्र प्रसाद, कर्पूरी ठाकूर दिले. तर ही निवडणूक या गौरवशाली भूमीच्या युवांसमोर संकट निर्माण करणाऱ्या लोकांच्या विरोधातील एक लढाई असल्याचे उद्गार योगींनी काढले आहेत.
राजद अन् महाआघाडीवर निशाणा
सिवानमध्ये पुन्हा जंगलराज येऊ देऊ नका. चांदबाबू यांच्या पुत्रावर याच सिवानमध्ये अॅसिड ओतण्याचा गुन्हा घडला होता. या गुन्हेगारांनी पुन्हा डोकं वर काढू नये. 2005 पूर्वी बिहार संकटाला सामोरे जात होते. आता बिहार विकासाची नवी गाथा लिहित आहे. डबल इंजिनच्या सरकारने याला आणखी मजबूत केले आहे. एखाद्या गुन्हेगार आणि माफियाची गळाभेट घेत बाबर आणि औरंगजेबच्या मजारीवर जाणे केवळ काँग्रेस, राजद आणि समाजवादी पक्षालाच शोभू शकते. परंतु हा प्रकार खऱ्या भारतीयाला शोभा देत नसल्याचे उद्गार योगींनी काढले आहेत. राजदचे नेते आजही अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवरील भगवान रामाच्या मंदिराला विरोध करत आहेत. सीतामढी आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रात माता जानकी भव्य मंदिर उभारणी आणि कॉरिडॉरच्या विकासाला राजदकडून विरोध होत असल्याचा आरोप योगींनी केला.
सभेत दिसले बुलडोझर
सिवानमध्ये मुख्यमंत्री योगींच्या सभेवरून लोकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. या सभेत बुलडोझरही दिसून आले, ज्यावर भाजप अन् संजदचे झेंडे लावण्यात आले होते. मुख्यमंत्री योगींचे स्वागत करून सभेत लोक बुलडोझर घेऊन पोहोचले होते.
Comments are closed.