आमच्या धक्क्याने पाकिस्तानला त्याच्या गुडघ्यावर आणले

22 एप्रिलच्या हल्ल्याचा घेतला 22 मिनिटांत सूड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजस्थानमध्ये घणाघात

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

दहशतवाद्यांनी पहलगाम येथे 22 एप्रिलला केलेल्या क्रूर हल्ल्याचा सूड आमच्या सेनादलांनी अवघ्या 22 मिनिटांमध्ये घेतला आहे. आमच्या सामर्थ्यामुळे पाकिस्तानला गुडघ्यावर यावे लागले आहे. आम्ही पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधात प्रारंभ केलेले ‘सिंदूर अभियान’ अद्यापही होत आहे. आम्ही पाकिस्तानला पाण्याच्या माध्यमातूनही धडा शिकविणार असून आमच्या वाट्याचे एक थेंबभरही पाणी त्याला मिळणार नाही, अशी व्यवस्था लवकरच केली जाणार आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान राज्यात केला आहे. राजस्थानातील बिकानेर येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर ते एका जाहीर सभेत भाषण करीत होते. दहशतवादाविरोधात शून्य सहनशक्ती हे आमचे ध्येय आणि धोरण आहेत. याच धोरणाचा भाग म्हणून सिंदूर अभियान यशस्वीरित्या हाती घेण्यात आले आहे. पाकिस्तानने यापुढे अशी वर्तणूक केली, तर त्याला आणखी मोठा धडा शिकविला जाईल. दहशतवाद संपल्याशिवाय जगात शांतता नांदणे कधीही शक्य होणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

राजस्थानला प्रथमच भेट

भारताच्या सैन्यदलांनी सिंदूर अभियानाचा प्रारंभ केल्यानंतरची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही प्रथमच राजस्थान भेट आहे. बिकानेर येथील जाहीर सभेत त्यांनी पाकिस्तानसंबंधातील भारताचे नवे धोरण विषद केले. पाकिस्तानने आमची कळ काढल्यास त्याला त्याची मोठी किंमत भोगावी लागेल, असा इशारा सिंदूर अभियानातून मिळाला आहे. या अभियानात पाकिस्तानच्या वायुदलाची प्रचंड हानी झाली. त्यांचा रहीम यार खान वायुतळ अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. पहलगाम हल्ल्याचा सूड घेण्यासाठी आम्ही पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर जोरदार हल्ले चढविले. या हल्ल्यांमध्ये अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. तरीही पाकिस्तानने त्याची गुर्मी चालविण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्या लष्करी आणि वायुतळांवर हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानचे 11 तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून, हा दणका तो देश विसरणार नाही. त्याला भारताच्या सामर्थ्याची चुणूक दिसली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

सर्व देश एकजूट

पाकिस्तानवर आम्ही जी कारवाई केली, त्या काळात सारा देश एकजुटीने आपल्या सैन्यदलांच्या पाठीशी उभा राहिला. यामुळे सैन्यदलांचे मनोबल वाढले आणि त्यांनी अभूतपूर्व अशी कामागिरी करत पाकिस्तानला मोठा धडा शिकविला. ज्यांनी भारताचे रक्त सांडले, यांचा हिशेब आम्ही पुरेपूर चुकता केला आहे. पाकिस्तानने यातून शहाणे व्हावे. तसे झाले नाही, तर त्याला क्षमा नाही. यापुढेही अशीच कार्यवाही होत राहील. आम्ही पुष्कळ सहन केले आहे. आता आम्ही मुळीच स्वस्थ बसणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला.

धोरणाची नवी त्रिसूत्री

दहशतवादाविरोधात भारताने तीन सूत्रांचे धोरण स्वीकारले आहे. प्रथम सूत्र म्हणजे आमच्यावर हल्ला झाला, तर त्याचे तीव्र प्रत्युत्तर हल्ला करुनच दिले जाईल. हे प्रत्युत्तर देण्याची वेळ, स्थान आणि प्रमाण निर्धारित करण्याचा पूर्ण अधिकार सेनादलांकडे असेल. द्वितीय सूत्र म्हणजे भारत कोणाच्याही अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीला भीक घालणार नाही. तिसरे धोरण म्हणजे, प्रत्युत्तर देताना आम्ही दहशतवादी आणि त्यांना पोसणारी किंवा त्यांच्यावर अवलंबून असणारी सरकारे यांच्यात फरक करणार नाही. जो देश दहशतवादाला खतपाणी घालत असेल, त्यालाही त्याच्या दहशतवादाची किंमत भोगावी लागणार असून त्याची कोणत्याही परिस्थितीत यातून सुटका होणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.

नव्या धोरणाची त्रिसूत्री…

  • ‘सिंदूर’ अभियानाच्या माध्यमातून भारताचे नवे त्रिसूत्री धोरण स्पष्ट
  • केलेल्या प्रत्येक पापाचा हिशेब पाकिस्तानला चुकता करावाच लागेल
  • पुन्हा भारताची कळ काढल्यास आत्तापेक्षाही अधिक मोठा धडा देऊ

Comments are closed.