आपला देश: 'सर्वोच्च' प्रशासकीय कार्यालय 'सेवातीर्थ'

मुकुट भाग

कोणत्याही देशाच्या सर्वोच्च प्रशासकीय नेत्याचे मुख्य कार्यालय हे त्या देशाचे सर्वाधिक अधिकार असणारे कार्यालय मानण्याची पद्धती आहे. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालयाची हीच ख्याती आहे. हे कार्यालय आता नव्या वास्तूत स्थलांतरित करण्यात आले असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच हे कार्यालय नव्या वास्तूत स्थलांतरित करण्यात आले आहे. नवी वास्तू कशी आहे, तिथे स्थलांतर करण्याची कारणे कोणती आहेत, तसेच मुळात या कार्यालयाचे एवढे महत्व कशासाठी असे अनेक प्रश्न या निमित्ताने आता चर्चेत आलेले आहेत…

स्वारस्यपूर्ण पार्श्वभूमी…

  • भारताला 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर ‘प्रधानमंत्री’ या पदाचीही निर्मिती झाली. हे पद देशाचे सर्वोच्च प्रशासकीय पद मानले जाते. राष्ट्रपती पद हे जरी तांत्रिकदृष्ट्या देशातील सर्वोच्च पद असले, तरी ते औपचारिक असते. देशाचे व्यवहार सांभाळण्याचे खरे अधिकार ‘प्रधानमंत्री’ या व्यक्तीलाच असतात, हे सर्वश्रुत आहे. या पदावरील व्यक्तीचे कार्यालय हे ‘प्रधानमंत्री कार्यालय’ म्हणून ओळखले जाते, जे सर्वोच्च प्रशासकीय कार्यालय आहे.
  • या कार्यालयाची प्रथम स्थापना 1949 मध्ये झाली. त्यावेळी ते प्रधानमंत्रीं सचिवालय म्हणून परिचित होते. या कार्यालयाचे काम प्रधानमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीला त्याच्या प्रशासकीय कार्यात साहाय्य करणे, विविध विषयांची माहिती आणि फीडबॅक पुरविणे, धोरणविषयक विमर्श आणि माहिती देणे, तसेच, प्रशासनाच्या इतर विभागांशी संपर्क ठेवण्यात त्यांना साहाय्य करणे हे आहे. हे कार्यालय जणू प्रधानमंत्री या व्यक्तीचा शरिराबाहेरील ‘मेंदू’ असते, असे मानतात.
  • या कार्यालयाच्या नावात प्रथम 1977 मध्ये परिवर्तन करण्यात आले. त्यावेळी देशात प्रथमच सत्तांतर झाले होते आणि जनता पक्षाचे मोरारजी देसाई ‘प्रधानमंत्री’ बनले होते. त्यांच्या पुढाकाराने या कार्यालयाचे नाव ‘प्रधानमंत्री कार्यालय’ असे करण्यात आले. घटनेत या कार्यालयाची तरतूद नाही. त्यामुळे ते  घटनेत तरतूद नसलेले (एक्स्ट्रॉ-कॉन्स्टि्यूशनल) पण अतिमहत्वाचे असे प्रशासनाचे अंग आहे. त्याचे अधिकार आणि कामे देश चालविण्यासाठी महत्वाची असतात.

कायदेशीर स्थान

या कार्यालयाची कार्यपद्धती, त्याचे अधिकार आणि कर्तव्ये यांसंबंधीचे औपचारिक नियम 1961 मध्ये निर्धारित करण्यात आले. प्रारंभीच्या काळात या कार्यालयाची महती विशेष नव्हती. तथापि, लालबहादुर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांच्या काळात या कार्यालयाचे महत्व विशेषत्वाने वाढल्याचे दिसून येते. प्रधानमंत्री हे पद, जनता आणि प्रशासन यांच्यातील संपर्कसेतू म्हणून आता ते परिचित आहे.

ढोबळ रचना

देशाचे प्रधानमंत्री हे या कार्यालयाचे प्रमुख असतात. तर कार्याचा मुख्य भार प्रधानमत्री मुख्य सचिवाकडे असतो. मुख्य सचिवांना साहाय्य करण्यासाठी अतिरिक्त सचिव, सहसचिव, संचालक, उपसचिव अशा अधिकाऱ्यांची नियुक्ती मुख्य सचिवांना साहाय्य करण्यासाठी केलेली असते. प्रधानमंत्र्यांच्या मुख्य सचिवांचे अधिकार मोठे असतात आणि त्यांचा प्रशासनावर प्रभाव असतो. यातील अन्य अधिकारी भारतीय नागरी सेवेतून आलेले असतात किंवा ते बाहेरचेही असतात. याखेरींज आवश्यकतेनुसार इतर कर्मचारीवर्गही नियुक्त करण्यात आलेला असतो.

महत्वाची कार्ये

  • प्रशासकीय साहाय्य : प्रधानमंत्रीपदावरील व्यक्तीला प्रशासन चालविण्यासाठी आवश्यक ते साहाय्य आणि आधार देणे, हे या कार्यालयाचे मुख्य कार्य आहे. प्रधानमंत्री हे देशाचे सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असल्याने त्यांच्या उत्तरदायित्वाचे निर्वहन त्यांना योग्य प्रकारे करता यावे, यासाठी आधार पुरविण्याचे कार्य आहे.
  • संपर्काचे उत्तरदायित्व : केंद्र सरकारच्या सर्व विभागांशी संपर्क ठेवण्याचे या कार्यालयाचे उत्तरदायित्व आहे. केंद्र सरकारची विविध मंत्रालये, तसेच देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्याशीही या कार्यालयाला सतत संपर्क ठेवावा लागतो. प्रशासन सुरळीतपणे चालविण्यासाठी हा संपर्क अतिमहत्वाचा मानला जातो.
  • धोरण निर्धारण : प्रधानमंत्री या पदावरील व्यक्तीला त्याच्या अधिकारातील क्षेत्रांसाठी निर्धारित करावयाचे धोरण याच कार्यालयात प्रथम ठरत असते. या कार्यालयातील विविध तज्ञ धोरणाची रुपरेषा ठरवितात. धोरणाचे कायदेशीरत्व, व्यवहार्यता आणि परिणाम यांचा विचारही अनेक तज्ञांकडून येथे केला जातो.
  • विवाद निवारण केंद्र – केंद्र सरकारचे विविध विभाग, विविध मंत्रालये, तसेच राज्यांची आणि केंद्रशानित प्रदेशांची सरकारे यांच्यात केंद्रीय धोरणांशी संबंधित काही वाद निर्माण झाले, तर तर ते या कार्यालयाकडे येतात. तेथे या वादांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे याला वादनिवारण केंद्र म्हटले जाते.
  • जनसंपर्क: प्रधानमंत्री आणि जनता यांच्यातील संपर्काचा एक महत्वाचे सेतू म्हणून या कार्यालयाकडे पाहिले जाते. येथे जनतेशी संपर्क ठेवण्यासाठी विशेष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. केंद्र सरकारची धोरणे जनतेपर्यंत नेणे आणि जनतेची प्रतिक्रिया आजमावणे हे कार्यही येथे केले जाते.

स्थानांतर कशासाठी…

  • अशा या भारतातील सर्वात महत्वाच्या प्रशासकीय कार्यालयाचे स्थानांतर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या सर्व विभागांची कार्यालयेही आता एका भव्य वास्तूत स्थानांतरीत करण्यात आली आहेत. आधी प्रधानमंत्री कार्यालय आणि इतर सर्व विभागांची कार्यालये वेगवेगळी आणि एकमेकांपासून दूर होती. ती विविध स्थानी विखुरलेली असल्याने विविध विभागांचा एकमेकांशी आणि प्रधानमंत्री कार्यालयाशी संपर्क होण्यात अडचण होती. कार्यालये लहानही होती.
  • जुन्या कार्यालयांमध्ये आधुनिक सुविधा, प्रभावी संपर्क यंत्रणा आणि पुरेशी जागा यांचा अभाव होता. त्यामुळे प्रशासन सुरळीत चालविण्यात अडचणी येत होत्या. कित्येक विभागांच्या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढविल्यास त्यांना काम करण्यासाठी जागाही अपुरी पडत होती. त्यामुळे प्रशासकीय कामांच्या वेगावर विपरीत परिणाम होत होता. अत्याधुनिक सुविधा अपुऱ्या असल्याने प्रशासनाच्या प्रभावशक्तीवरही परिणाम होत असल्याचा अनुभव कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत होता.
  • सर्वसामान्यांचीही अडचण : विविध विभागांची कार्यालये विविध स्थानी विखुरलेली असल्याने सर्वसामान्य एका विभागातून दुसऱ्या विभागात जाण्यासाठी बरीच पायपीट आणि खर्च करावा लागत असे. विभागांच्या कार्यालयांमध्ये अंतरही बरेच असल्याने लोकांना त्रास होत असे. खर्च आणि वेळ या दोन्ही दृष्टींनी सर्वसामान्यांसाठी पूर्वीची व्यवस्था अडचणीची असल्याच्या तक्रारी येत होत्या.
  • सुरक्षेसाठी अतिरिक्त खर्च : केंद्र सरकारच्या विविध विभागांची कार्यालये एकमेकांपासून दूर आणि स्वतंत्र वास्तूंमध्ये असल्याने त्यांच्या संरक्षणाची व्यवस्थाही वेगवेगळी करावी लागत असे. त्यामुळे संरक्षण व्यवस्थेचा खर्चही मोठ्या प्रमाणात होत असे आणि सुरक्षा सैनिकांची संख्याही अधिक लागत असे. सुरक्षा यंत्रणेला धावपळही विनाकारण बऱ्याच प्रमाणात करावी लागत असे. हे सर्व त्रास दूर व्हावेत, अशी मागणी अधिकारी आणि जनता या दोघांकडूनही केली जात होती.
  • एकत्रीकरणाचे लाभ अनेक : आता प्रधानमंत्री कार्यालय आणि इतर विभागीय कार्यालये, ही सर्व एकाच भव्य वास्तूत स्थानांतरित करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री कार्यालय हे या नव्या संकुलाच्या ‘सेवा तीर्थ-1’ या भागात आहे, तर ‘सेवा तीर्थ-2’ या भागात महत्वाच्या विभागांची कार्यालये आहेत. या संकुलाच्या ‘कर्तव्य भवन’ या भागात इतर प्रशासकीय कार्यालये आहेत. या एकत्रीकरणाने वर उल्लेखिलेल्या समस्या आणि अडचणी आता दूर झाल्या आहेत.

‘सेवा तीर्थ’ची प्रमुख वैशिष्ट्यो

  • विविध सुविधा आणि सोयी : पूर्वीपेक्षा जवळपास दुप्पट जागा, अत्याधुनिक संपर्क यंत्रणा, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठीही अनेक सुविधा, सोयी, तसेच संपर्क आणि यंत्रसामग्री, सहज हालचाल आणि वेगाने काम करण्याच्या सुविधा.
  • स्वतंत्र ‘भारतगृहा’ची सोय : आंतरराष्ट्रीय अतिथी आणि इतर देशांचे प्रतिनिधी यांचे स्वागत आणि वास्तव्य यांच्यासाठी विशेष ‘भारतगृहा’ची उपलब्धता. ही सुविधा पूर्वी नव्हती. ती आता प्रथमच उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
  • कार्यक्षमतावृद्धीसाठी रचना : अधिकारी आणि कर्मचारी यांचा उत्साह आणि कार्यक्षमता यांना प्रोत्साहन देणारी रचना आणि वातावरणनिर्मिती. ओपन प्लॅन इंटिरिअर्स, एन्क्रिप्टेड संपर्क यंत्रणा, अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था, प्रशस्त जागा.
  • एकत्रीकृत कार्यालये : सर्व विभागांची कार्यालये एकाला एक लागून असल्याने सर्वसामान्यांची सोय. सर्व कार्यालयांमध्ये नव्या पायाभूत सुविधा. त्यामुळे वेगवान कार्याला प्रेरणा आणि आंतरविभागीय संपर्कही वेगवान होण्याची प्रक्रिया.
  • पर्यावरणस्नेही रचना : संपूर्ण संकुलाची रचना पर्यावरणाच्या संरक्षणाची जाणीव ठेवून केलेली. पुनउ&पयोगी ऊर्जेचा उपयोग आणि ‘हरित तत्चा’च्या आधारावर केलेली रचना. त्यामुळे ऊर्जेची बचत आणि जास्तीत जास्त उपयोग.
  • परंपरा-आधुनिकता यांचे मिश्रण : नव्या वास्तूच्या रचनेत भारताच्या पुरातन वास्तू शैली आणि अत्याधुनिकता यांचे कलात्मक मिश्रण. हिंदू पद्धतीची वास्तू रचना, बौद्ध पद्धतीचे धातूनिर्मिती घुमट, इतर परंपरांचे दर्शन घडविणारी वास्तू.

परदेशी गुलामगिरीच्या भावनेपासून स्वातंत्र्य

भारताचे प्रशासन हाताळणारी यंत्रणा परकीय दास्याची भावना जपणाऱ्या आणि त्या शैलीत निर्माण झालेल्या वास्तूमध्ये असू नये, हा विचार नव्या संकुलाच्या रचनेमागे आहे. वसाहतवादी संस्कृतीची आणखी एक स्मृती या स्थानांतरामुळे गळून पडली आहे. नव्या, सामर्थ्यवान भारताचे दर्शन घडविणारी आणि परंपरा अधिक आधुनिकता यांचा एकाचवेळी अनुभव देणारी ही नवी प्रशासकीय वास्तू.

संकलन : अजित दात्ये

Comments are closed.