आपली शक्ती केवळ शस्त्रास्त्रांमध्येच नाही.
पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, केंद्र सरकारच्या पहलगामवर भूमिकेला तेलगु देशमचा पाठिंबा
वृत्तसंस्था / अमरावती (आंध्र प्रदेश)
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी भारत सरकार जे पाऊल उचलेल, त्याचे पूर्ण समर्थन करण्याची घोषणा तेलगु देशमचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि जनसेना पक्षाचे नेते तसेच आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवनकल्याण यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशची प्रस्तावित राजधानी अमरावतीचा दौरा केला आहे.
येथे त्यांनी आंध्र प्रदेशासाठीच्या हजारो कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीकार्याचा प्रारंभ केला आहे. अमरावती हे आमचे स्वप्न होते. ते आता पूर्णत्वास जाताना पाहून आम्हाला आनंद होत आहे. आंध्र प्रदेशच्या विकासासाठी नेहमीच केंद्र सरकार तत्पर आहे. यापुढेही हेच धोरण अवलंबिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. प्रकल्पांच्या कार्याचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी येथे एका जाहीर सभेत भाषण केले. पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधारांना सोडले जाणार नाही, या आपल्या निर्धाराचा त्यांनी भाषणात पुनरुच्चार केला.
दोन्ही नेत्यांकडून पूर्ण समर्थन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. पहलगाम हल्ल्यासंदर्भात भारत सरकार जी कारवाई करणार आहे, तिला आमचे पूर्ण समर्थन असेल. हा हल्ला अत्यंत भीषण आणि संताप आणणारा आहे. या हल्ल्याच्या सूत्रधारांचा माज उतरविण्यासाठी केंद्र सरकार जे काही करेल, याला आम्ही केंद्र सरकारमधील सभभागी पक्ष या नात्याने पूर्ण पाठिंबा देत आहोत, असे या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भाषणांमध्ये स्पष्ट केले आहे.
पवन कल्याण यांचे इंग्रजीतून उद्गार
पहलगाम हल्ला झाल्यानंतर बिहारमध्ये आयोजित जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याच्या सूत्रधारांना, ते जिथे लपले आहेत, तिथून बाहेर काढून संपवू अशी घोषणा केली होती. ही घोषणा साऱ्या जगाला समजावी, यासाठी त्यांनी काही वाक्ये इंग्रजी भाषेतून उच्चारली होती. शुक्रवारी अमरावती येथील जाहीर सभेत पवनकल्याण यांनी याचे अनुकरण करत दहशतवाद्यांना कठोर इशारा देणारी वाक्ये इंग्रजीतून उच्चारली आहेत. पाकिस्तानने पेलेल्या या अमानवी कृतीची फळे आता त्या देशाला भोगावी लागणार आहेत, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली आहे.
आमची शक्ती एकात्मतेत
केवळ शस्त्रसंभार ही आमची एकमात्र शक्ती नाही. आमचे खरे शक्तीस्थान आमची एकात्मता हे आहे. याचे प्रतिक म्हणून आम्ही एकता मॉल्स साऱ्या देशात स्थापन करीत आहोत. आज आंध्र प्रदेश ज्या वेगाने पुढे जात आहे तो वेग कौतुकास्पद आहे. या राज्याच्या प्रगतीत मी आणि केंद्र सरकार आंध्र प्रदेश सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करताना तुम्हाला दिसून येईल. राज्यांच्या प्रगतीतच देशाच्या प्रगतीचे मूळ आहे, अशा अर्थाचे उद्गारही त्यांनी काढले.
केंद्राचा संपूर्ण पाठिंबा
आंध्र प्रदेशला केंद्र सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. हे राज्य मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वात माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, पर्यावरणस्नेही उद्योग, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रामध्ये अजोड कामगिरी करत आहे. केंद्र सरकारचा अशा प्रकल्पांना नेहमी पाठिंबा राहणार आहे. आज भारत पायाभूत क्षेत्राच्या अद्ययावतीकरणात जगात सर्वात वेगाने काम करणारा देश म्हणून गणला जातो. तो लवकरच जगाच्या उत्पादनाचे केंद्र बनणार आहे. या प्रगतीत आंध्र प्रदेशचे स्थान अग्रगण्य असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दहशतवाद हे साऱ्या मानवतेसमोरचे संकट असून त्याच्याशी आपल्या साऱ्यांना एकत्रितपणे दोन हात करावे लागणार आहेत. आपल्या देशाची सेनादले सामर्थ्यवान असून त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आमच्यावर झालेल्या हल्ल्याला आम्ही योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य स्थानी प्रत्युत्तर देणार आहोत. जनतेने याची शाश्वती बाळगावी, असे प्रतिपादनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
एकता हे आमचे बलस्थान…
ड भारताचे खरे शक्तीस्थान आमची एकात्मता हे असल्याचे ठाम प्रतिपादन
ड आंध्र प्रदेशच्या प्रगतीत केंद्र सरकार खांद्याला खांदा लावून आहे भागीदार
ड भारतावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना धडा शिकविणार हे आहे निश्चित
ड पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आंध्रच्या नेत्यांचे केंद्राला पूर्ण समर्थन
Comments are closed.