धक्कादायक! ऐतिहासिक वांद्रे किल्ल्यावर दारूपार्टी; पर्यटन विभागाने दिली परवानगी… दुर्गप्रेमींमध्ये संतापाची लाट

मुंबईतील ऐतिहासिक वांद्रे किल्ल्यावर दारूपार्टी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक रहिवाशांनी शूट केलेला या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर दुर्गप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पर्यटन विभागाने या पार्टीला परवानगी दिल्याचा दावा आयोजकांनी केल्याने राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे.

मुंबईतील वांद्रे किल्ला हा महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचा साक्षीदार आहे. पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला नंतर अनेक वर्षे ब्रिटिशांच्या ताब्यात होता. अरबी समुद्राचे मनोहारी दर्शन घडवणारा हा किल्ला पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. हेरिटेज दर्जा असलेल्या या किल्ल्यावर शनिवारी रात्री दारूपार्टी झाली. स्थानिक रहिवाशांनी याबाबत तक्रार केली आणि पोलिसांना घेऊनच ते किल्ल्यावर गेले. त्या वेळी आयोजकांनी तक्रारदारांशी आणि पोलिसांशीच हुज्जत घातली. आम्हाला विचारणारे तुम्ही कोण, आम्ही परवानगी घेतली आहे, असे त्यांनी सांगितले. परवानगीचे पत्र दाखवण्यास मात्र नकार दिला.

परवानगी देणाऱयांवर कारवाई करा!

किल्ल्यावर दारूपार्टीला परवानगी देणे हा चुकीचा पायंडा आहे. ऐतिहासिक स्थळाचे पावित्र्य नष्ट करण्याचा उद्देश यामागे दिसत आहे. हे पाप आहे. लाच घेऊन ही परवानगी दिली गेली असावी, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. या पार्टीला परवानगी देणाऱया संबंधित अधिकाऱयांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

हेच ते ढोंगी हिंदुत्व; शिवसेनेचा हल्ला

शिवसेनेचे अखिल चित्रे यांनी हा व्हिडिओ ‘एक्स’वर शेअर केला. महाराष्ट्र पर्यटन विभाग या पार्टीचा आयोजक असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी राज्य सरकारचा उत्पादन शुल्क विभाग आणि महापालिका परवानगी देतेच कशी, नक्की काय सुरू आहे, असा सवाल त्यांनी केला. मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून सुरुवात करायची आणि नंतर हेच उपद्व्याप इतर किल्ल्यांवर करायचे, हेच भाजप आणि त्यांच्या नोकर पक्षांचे ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती आहे, अशी टीका चित्रे यांनी केली.

…तर कारवाई करू – मुख्यमंत्री

‘‘मी हा व्हिडिओ पाहिलेला नाही. काही लोकांकडून मला त्याविषयी कळले आहे. अशा प्रकारे पार्टीला परवानगी दिली असेल तर नक्कीच कारवाई केली जाईल,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Comments are closed.