भीमाशंकरच्या जंगलात गावकऱ्यांना बंदी; अधिकाऱ्यांची मोगलाई, सुरक्षा लावून वाटा अडवल्या शिवसैनिकांनी धडक देत झाडांची कत्तल रोखली
टोरंट पॉवर प्रकल्पाच्या नावाखाली कर्जत-भीमाशंकरच्या जंगलातील अडीच लाख झाडांची कत्तल केली जाणार असून याचा प्रसारमाध्यमातून पर्दाफाश होताच या कत्तलीचे पाप जगासमोर येऊ नये यासाठी सरकारने गावकऱयांना जंगलात जाण्यास बंदी घातली आहे. त्यासाठी ठिकठिकाणी खासगी सुरक्षा रक्षक तैनात करून वाटा अडवण्यात आल्या आहेत. पर्यावरणाचा मसणवट करण्याच्या महायुती सरकारच्या कारभाराविरोधात संतापाची लाट उसळली असून साय डोंगर येथे आज शिवसैनिकांनी धडक देऊन झाडांची कत्तल रोखली.
रायगड व पुणे जिह्यातील 576 एकरवरील जंगल बेचिराख करून गुजरातच्या टोरंट पॉवर कंपनीच्या घशात ही जागा घालण्याचा डाव आहे. याठिकाणी 13 हजार 500 कोटी रुपये खर्चाचा आणि तीन हजार मेगाव्हॅट क्षमतेचा विद्युत प्रकल्प उभारला जाणार आहे. मात्र यासाठी संपूर्ण हरित पट्टय़ावर कुऱहाड चालवली जाणार असून तब्बल अडीच लाख झाडे तोडली जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेकडो कामगारांच्या टोळ्या कर्जत तालुक्यातील साय डोंगराच्या परिसरात घुसवून वृक्षांची खुलेआम कत्तल केली जात आहे. या उच्छादाचे व्हिडीओ स्थानिक गावकऱयांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला. शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीसह विविध संघटनांनी या मुद्दय़ावर आवाज उठवला आहे. त्यामुळे हादरलेल्या सरकार आणि टोरंट पॉवर कंपनीने मोगलाई करण्यास सुरुवात केली असून जंगलाच्या बॉर्डरवर ठिकठिकाणी खासगी सिक्युरिटी तैनात करून गावकऱ्यांना जंगलात जाण्यास बंदी केली आहे.
शिवसैनिकांचा हिसका
साय डोंगरात झाडांच्या सुरू असलेल्या कत्तलीचे काम आज संतप्त शिवसैनिकांनी बंद पाडले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिक जंगलात घुसले आणि त्यांनी पालीखलाटी येथे झाडे कापत असलेल्या कामगारांना पिटाळून लावले. यावेळी तालुकाप्रमुख बाजीराव दळवी, अॅड. संपत हडप, जिल्हा परिषद सदस्या सुनीता मोरे, कल्पेश खडे, रोहिदास मोरे तसेच शेकडो शिवसैनिकांनी भगवे झेंडे घेऊन टोरंट पॉवरविरोधात घोषणा दिल्या.
आदित्य ठाकरे आज करणार पाहणी
झाडांच्या कत्तलीविरोधात भूमिपुत्रांसह पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवूनही सरकार त्याकडे कानाडोळा करत आहे. महाराष्ट्राच्या निसर्गाची माती करून सुरू असलेल्या या भकास कारभाराविरोधात शिवसेना आवाज उठवणार असून उद्या शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे स्वतः कर्जतच्या साय डोंगरात जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत व ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत.
राज ठाकरे घेणार सभा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे 28 ऑक्टोबर रोजी कर्जतचा दौरा करणार असून साय डोंगरातील वृक्ष कत्तलीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते संध्याकाळी कर्जत पोलीस मैदानावर सभा घेऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत. कर्जत पर्यावरण बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱयांनी आज त्यांची भेट घेतली.
Comments are closed.