निगरगट्ट सत्ताधार्‍यांना शेतकर्‍यांच्या अश्रूची किंमत नाही, जिल्हाप्रमुख उल्हास गिराम उदिग्न

बीड जिल्ह्यात वर्ष भरात तब्बल एक हजार  शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या आहेत, एक हजार शेतकर्‍याची कुटंब उद्ध्वस्त झाली आहेत. शेकडो कुटुंब कसे बसे तग धरून आहेत, चार दिवसाच्या पावसाने शेतकर्‍यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे, शेतकरी कंगाल झाला आहे, त्याला आधार देणे गरजेचे आहे. मात्र निगरगट्ट सत्ताधार्‍यांना शेतकर्‍यांच्या अश्रूची किंमत नाही. तातडीने नुकसान भरपाई देणे गरजेचे असल्याचे म्हणत आपल्या भावना व्यक्त करताना शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास गिराम उदिग्न झाले.

बीड जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसात अतिवृष्टीने अक्षरश: शेतकर्‍यांना उद्धवस्त केले आहे. तब्बल तीन लाख हेक्टरवरील खरीप हंगाम पाण्यावर तरंगत आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. आलेल्या पुरात शेती वाहून गेली आहे. चिंतातूर शेतकरी निसर्गाच्या कोपापुढे हतबल झाला आहे. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळत आहेत. गेल्या वर्षभरात बीड जिल्ह्यामध्ये तब्बल एक हजार शेतकर्‍यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या आहेत. त्यापेक्षाही भयंकर आणि विदारक परिस्थिती सध्या उद्भवली आहे. खरीप हंगाम उद्धवस्त झाल्याने भविष्य अंधारमय झाले असल्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्येत मोठी वाढ होते की काय अशी भीती आता वाटू लागली आहे. अशा गंभीर आणि भयंकर परिस्थितीत शेतकर्‍यांना आधार देण्याचे काम सरकारने केले पाहिजे. सत्ताधारी शेतकर्‍यांना आधार देण्याऐवजी गटागटात, जाती जातीत, धर्मा धर्मात वाद निर्माण करून आपली पोळी भाजून घेत आहेत. अत्यंत गंभीर परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये उद्भवली आहे. सत्ताधार्‍यांनी शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी तातडीने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. पिकविमा कंपनी घोळत ठेवण्याचे काम करत आहे तर सरकार शेतकर्‍यांची दिशाभूल करत आहेत. शेतकर्‍यांच्या अश्रूची किंमत या निगरगठ्ठ सत्ताधार्‍यांना नक्कीच नाही अशा उदिग्न भावना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांनी व्यक्तकेल्या आहेत.

Comments are closed.