अमेरिकेला ‘डेविन’ हिमवादळाचा तडाखा; 1800 हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द, कॅलिफोर्नियात अतिवृष्टीमुळे महापूर, तिघांचा मृत्यू

अमेरिकेला ‘डेविन’ हिम वादळाचा तडाखा बसला आहे. नाताळच्या सुट्ट्या सुरू असतानाच अमेरिकेच्या ईशान आणि मध्य-पश्चिम भागात हिम वादळाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे कॅलिफोर्नियामध्ये अतिवृष्टीमुळे महापूर आला आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. हिम वादळामुळे आतापर्यंत 1800 हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले असून 22 हजारांहून अधिक विमानांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. यामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

हिमवादळामुळे अमेरिकेतील विमान वाहतूक सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. ‘फ्लाईटअवेअर’च्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी दुपारपर्यंत 1800 हून अधिक विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर 22 हजारांहून अधिक विमानांना उशीर झाला. हिमवादळाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्कमधील जेएफके (JFK), नेवार्क आणि ला गार्डिया विमानतळांना बसला.

जेटब्लू, डेल्टा आणि अमेरिकन एअरलाईन्सच्या सर्वाधिक फेऱ्या रद्द झाल्या आहेत. जेटब्लूने एकट्या ईशान्य भागात 350 उड्डाणे रद्द केली. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कंपन्यांनी ‘चेंज फी’ माफ केली आहे. तर दुसरीकडे कॅलिफोर्नियात महापुराचे थैमान सुरू आहे. कॅलिफोर्नियामध्ये अतिवृष्टीमुळे पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

साक्रामेंटोमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाचा रस्ते अपघातात, तर सॅन डिएगोमध्ये झाड अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात आतापर्यंत एकूण तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच सॅन बर्नार्डिनो कौंटीमध्ये घरांमध्ये 5 फुटांपर्यंत चिखल साचल्याने अनेक नागरिक अडकून पडले होते. अग्निशमन दलाने प्रयत्नांची शर्थ करत नागरिकांची सुटका केली. गव्हर्नर गॅविन न्यूजम यांनी 6 जिल्ह्यांमध्ये आणीबाणी घोषित केली आहे.

सतर्कतेचा इशारा

ईशान्य भागात ताशी 1 ते 2 इंच बर्फवृष्टी होत असून न्यूयॉर्क प्रशासनाने नागरिकांना गरज नसल्यास प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. शनिवारी सकाळपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि सुरक्षित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.