हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमली…

‘जाता पंढरीशी सुख लागे जीवा’ असे भक्तिभान मनात ठेवत माघी वारीसाठी पाच लाखांहून अधिक भाविकांनी पंढरीत उपस्थिती लावली. चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा करत लाखो भाविकांनी हरिनामाचा जयघोष करत माघी एकादशी साजरी केली. यामुळे पंढरीनगरी वैष्णवमय झाली आहे. मजल दरमजल करत संतांच्या दिंडय़ांबरोबर लाखोंच्या संख्येने भाविक माघी यात्रा एकादशीच्या मुख्य सोहळय़ाला पंढरीत आले. भाविकांमुळे मठ, मंदिरे, धार्मिक शाळा, संस्थाने गजबजून गेली आहेत. 65 एकर येथील भक्तिसागर, रेल्वे मैदान, उपनगरीय भागातही भाविक राहुटय़ा, तंबू उभारून वास्तव्य करत आहेत. भजन, कीर्तन, प्रवचनात महाराज मंडळी, तर ऐकण्यात भाविक दंग झाले. माघी शुद्ध जया एकादशीनिमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा संपन्न झाली. विविध रंगांच्या आकर्षक फुलांनी मंदिराची सजावट करण्यात आली. दर्शनासाठी भाविकांना सुमारे 8 ते 10 तासांचा अवधी लागत होता. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समितीच्या वतीने पिण्याचे पाणी, शौचालये, लाईव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

Comments are closed.