सिंधूची समुराई शिकार, तीन वेळच्या जगज्जेत्या यामागुचीला नमवत जपान ओपनवर ऐतिहासिक मोहोर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दोन वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ… टीकाकारांचे हल्ले करणारे प्रश्न… वारंवार दुखापतींचे सावट… आणि समोर घरच्या प्रेक्षकांच्या प्रचंड पाठिंब्यावर खेळणारी तीन वेळची विश्वविजेती अकाने यामागुची, पण पी. व्ही. सिंधूने या सर्वांना एकाच फटक्यात उत्तर दिले. तिने आक्रमक, संयमी आणि तांत्रिकदृष्टय़ा अफलातून खेळ करत यामागुचीचा 21-17, 21-17 असा सरळ गेममध्ये पराभव केला आणि जपान ओपन सुपर 750 स्पर्धेचे ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. या विजयासह जपान ओपन जिंकणारी पहिली हिंदुस्थानी खेळाडू होण्याचा मानही सिंधूने पटकावला.

टोकियोत जपानी चाहत्यांचा जल्लोष यामागुचीसाठी होता. पण कोर्टवर राज्य गाजवलं ते सिंधूने. पहिल्याच गुणापासून तिने प्रतिस्पर्धीवर मानसिक दडपण आणले. अचूक नेट प्ले, भेदक क्रॉस-कोर्ट स्मॅश आणि प्रदीर्घ रॅलींमध्ये दाखवलेला संयम यामुळे यामागुचीला सतत बचावात्मक खेळ करावा लागला. जपानी स्टारला स्वतःच्या घरच्या कोर्टवर सिंधूने अक्षरशः नाचवलं.

पहिल्या गेममध्ये सिंधूने 3-0 अशी झंझावाती सुरुवात केली. यामागुचीने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, पण मध्यंतरानंतर 36 फटक्यांच्या थरारक रॅलीत गुण जिंकत सिंधूने पुन्हा सामन्यावर पकड मजबूत केली. निर्णायक क्षणी सलग गुणांची आतषबाजी करत तिने पहिला गेम 21-17 असा आपल्या नावावर केला.

दुसऱया गेममध्ये तर सिंधू आणखी आक्रमक झाली. 8-3 अशी आघाडी घेत तिने यामागुचीला सतत धावत ठेवले. 44 फटक्यांच्या दमछाक करणाऱ्या रॅलीतही सिंधूच वरचढ ठरली. यामागुचीने शेवटपर्यंत हार मानली नाही आणि फरक 19-17 पर्यंत आणला. पण निर्णायक क्षणी सिंधूने अनुभवाचा कस दाखवत कोणतीही चूक न करता सलग दोन गुण जिंकले आणि जपानच्या भूमीवर हिंदुस्थानचा तिरंगा दिमाखात फडकवला.

या विजयाने सिंधूने केवळ विजेतेपद जिंकले नाही, तर तब्बल 19 महिन्यांचा बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपदाचा दुष्काळही संपवला. डिसेंबर 2024 मधील सैयद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेनंतरचे हे तिचे पहिले विजेतेपद ठरले. त्याचबरोबर 2019 नंतर प्रथमच सुपर 750 किंवा त्यापेक्षा मोठ्या दर्जाच्या स्पर्धेवर तिने नाव कोरले.

विजयानंतर भावुक झालेल्या सिंधूने सांगितले, ‘हा विजय माझ्यासाठी खूप खास आहे. अंतिम फेरी गाठणं आणि विजेतेपद जिंकणं यात खूप फरक असतो. या यशामुळे माझा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. माझे प्रशिक्षक, आई-वडील, सपोर्ट स्टाफ आणि माझ्या पतीचे मनापासून आभार.’

Comments are closed.